जळगाव : समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी सोमवार दि, २५ रोजी दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.खटल्याचा निकाल लागणार असल्याने आदेशबाबाला सकाळी ११ वाजताच न्यायालयात आणण्यात आले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी पीडितेची आई तथा मुळ फिर्यादी, अखिल भारतीय सफाई कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण चांगरे यांच्यासह नातेवाईक मोठ्या संख्येने न्यायालयात थांबून होते.दोन मिनिटात ठरविले दोषीदुपारी तीन वाजता कामकाज होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार तीन वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी आदेशबाबाला हजर करण्याचे आदेश दिले. दोन मिनिटातच न्यायालयाने आदेशबाबा याला सर्व दाखल कलमाखाली दोषी ठरविल्याचे जाहीर करुन शिक्षा २७ रोजी सनावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आदेशबाबाला बाहेर काढण्यात आले.
काय आहे प्रकरणसमता नगरातील ९ वर्षीय बालिका १२ जून २०१८ रोजी सायंकाळी घरातून गायब झाली होती. त्यानंतर १३ रोजी पहाटे सहा वाजता घरासमोरच टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेह आढळून आला होता. बालिका बेपत्ता झाल्यानंतर याच परिसरात राहणारा आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३) याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पीडितेची वैद्यकिय तपासणी व शवविच्छेदनानंतर खून व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले होते. फास्ट ट्रॅक चालला खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या न्यायालयात फास्ट टॅक हा खटला चालला. सरकारतर्फे २७ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यात हर्षल प्रकाश केतकर, बालिकेचे शवविच्छेदन करणारे डॉ.निलेश देवराज, पंच मनोज पाटील, भागवत सानप, १५ वर्षाची मुलगी, फिर्यादी मनिषा नरेश करोसिया, रिना राजेंद्र तिवारी, रेखा संजय सोनवणे, रमेश रामदास पाटील, पोलीस कर्मचारी महेश पवार, गणेश देसले, ललित भदाणे, अरुण पाटील, पंच संजय सपकाळे, तहसीलदार अमोल निकम, संतोष कान्हेरे, डीएनए तज्ज्ञ वैशाली महाजन, जन्म मृत्यू निबंधक डॉ.विकास पाटील, डॉ.ऋतुराज चव्हाण, डॉ.अक्षय देशमुख, डॉ.स्वप्नील बढे, तपासाधिकारी बापु रोहोम, उपनिरीक्षक भागवत पाटील, कैलास पाटील, सुरेश गणेशसिंग बयास व प्रवीण मोरे यांच्या साक्षी झाल्या. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, आदेशबाबाच्यावतीने अॅड.गोपाळ जळमकर, अॅड. विजय दर्जी तर मुळ फिर्यादीतर्फे अॅड.एस.के.कौल यांनी काम पाहिले आहे.अटकेपासून संशयित कारागृहातच आहे.