लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाऊन काळात सासऱ्यांकडून घेतलेले दीड लाख रुपये फेडायचे असल्याचे जावयाने चक्क बँकेतून रोकड काढणाऱ्यांची बॅग लांबविण्याचाच निर्णय घेतला अन् तेथेच फसगत झाल्याने सर्वच कारनाम्यांचा भंडाफोड झाला. राहुल उत्तम चौधरी (वय २५, रा.मांडकी, ता.भडगाव) असे या जावयाचे नाव असून त्याचे प्रताप पाहता पत्नी व सासऱ्यांनी डोक्याला हात मारुन घेतला. दरम्यान, रविवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, राहुल याने बँकेत नोकरीला असल्याचे खोटे सांगून छोकरी मिळविल्याचेही उघड झाले आहे.
काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीकडे चालत जात असलेले धनराज प्रेमराज पुरोहित (६०, रा.शनिपेठ) यांच्या हातातील बॅग हिसकावताना राहुल चौधरी हा शनिवारी दुपारी एक वाजता दुचाकीवरून खाली पडला अन् जमावाच्या तावडीत सापडला होता. जमावाच्या मारहाणीत तो जागेवरच बेशुध्द पडला होता. धनराज पुरोहित यांच्या फिर्यादीवरून राहुल चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. तपासाधिकारी दीपक बिरारी यांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
बँकेत ड्युटीला जातो म्हणून सांगायचा घरी
राहुल हा काहीच कामधंदा करीत नाही. सैन्य दलाची नोकरी सोडून जळगाव शहरातील एचडीएफसी बँकेत नोकरीला आहे, असे खोटं सांगून त्याने मुलगी मिळविली. लग्न झाल्यानंतर रोज दुचाकी घेऊन तो काव्यरत्नावली चौकातील बँकेत ड्युटीला चाललो असे घरी सांगून घराच्या बाहेर पडायचा. संध्याकाळ झाली की घरी परत जायचा. सासरवाडी जळगाव शहरातीलच असून सासरे उच्चभ्रू आहेत. लॉकडाऊन काळात राहुल याने सासऱ्यांकडून दीड लाख रुपये घेतले. हा विषय पत्नीला माहिती होता. आता १४ फेब्रुवारी रोजी मुलाचे लग्न असल्याने सासऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला. शालकाचे लग्न म्हटले म्हणजे पैसे द्यावेच लागतील, किती दिवस थापा मारायच्या..म्हणून त्याने बँकेतून रोकड घेऊन जाणाऱ्या सावजचा शोध घेतला. दुचाकीची नंबर प्लेट उलटी केली. बँकेत दबा धरून बसलेला असताना धनराज पुरोहित यांना त्याने हेरले. त्यांचे वय, प्रकृती पाहता त्यांच्याजवळील बँक हिसकावणे सहज शक्य आहे, असे समजून बँकेच्या बाहेर निघून थोडे चालत आलेल्या पुरोहित यांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी बॅग घट्ट पकडून ठेवल्याने ते बॅगसह ओढले गेले. त्यात राहुल दुचाकीवरून खाली पडला अन् पब्लिकच्या हाती लागला. तेथेच त्याचा भंडाफोड झाला.