जोहानस वेरमीर’ हा सतराव्या शतकातील डच चित्रकार होता. तो ‘ट्रोनी’ प्रकारात तैलचित्रे काढण्यासाठी ओळखला जातो. ट्रोनी म्हणजे डच भाषेत ‘चेहरा’. या चित्रप्रकारात मानवी चेह-यावरील आनंद, दु:ख, आश्चर्य, मुग्धता वगैरे कोणता तरी भाव अगदी ठळकपणे दाखवला जातो. यातील मानवी चेहरा बहुदा काल्पनिक किंवा आधारित असतो. म्हणून ते ‘पोर्ट्रेट’पेक्षा वेगळं असतं. कोणा प्रत्यक्ष व्यक्तीला जसंच्या तसं चित्रात रंगवणं हे झालं ‘पोर्ट्रेट’; आणि एखाद्या ‘मॉडेल’ला नजरेसमोर ठेवून त्या आधारे चेहरा काढणे हे आहे ‘ट्रोनी’.मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र नक्की कोणाचं आहे यावर एकमत नसलं, तरी ते कोणातरी विशिष्ट स्त्रीचं आहे हे नक्की. पण वेरमीरची ही मुलगी फक्त ‘एक मुलगी’ आहे. तरीही कलाजगतात ती इतकी गाजली, की तिला ‘छोटी मोनालिसा’ म्हणून ओळखतात. कला समीक्षक तिची तुलना नेहमी मोनालिसाशी करतात. वस्तुत: ती मोनालिसापेक्षा जवळजवळ दीडशे वर्षांनी लहान आहे. १६६५च्या सुमारास हे चित्र वेरमीरने काढलंय. चित्राचं शीर्षक ‘गर्ल विथ अ पर्ल इअररिंग’ एवढं असलं, तरी त्याचा उल्लेख अनेकदा नुसताच ‘गर्ल’ असा होतो- ‘ती मुलगी’ ! मोनालिसा ही एक गूढ, पारलौकिक भासणारी सुंदरी आहे; तर ही ‘मुलगी’ अगदी साधी, सामान्य पातळीवरची आहे. ती आसपास कुठेही आढळावी अशी आहे. असा प्रवाद आहे की वेरमीरच्या घरी कामाला असलेल्या एका सुस्वरूप मोलकरणीचं हे चित्ररूप आहे. (‘हाऊस मेड’ला ‘मोलकरीण’शिवाय दुसरा कोणता शब्द वापरणार?)निळं-केशरी कापड डोक्याला गुंडाळून, आपल्या टपोºया डोळ्यांनी खांद्यावरून थेट आपल्याकडे रोखून बघणारी ही मुलगी मोलकरीण वाटत मात्र नाही. तिची ओळख असलेलं कानातलं आभूषण मोत्याचं आहे की नाही, यावरही वाद आहेत. कारण त्या ‘मोत्याचा’ आकार अनैसर्गिकरित्या मोठा आहे. इतका भला मोठा मोती नसतोच म्हणे! ते काहीही असो, पण आपल्या पाणीदार मोत्यासारख्या डोळ्यांनी बघणाºयाचा वेध घेणाºया या मुलीने अनेकांना भुरळ पाडली.ट्रेसी शॅव्हलिअर या लेखिकेने १९९९ साली या चित्रावरून, त्याच नावाची एक कादंबरी लिहिली. त्यात असं दाखवलंय की, चित्रकार वेरमीरकडे ‘ग्रीट’ नावाची एक तरुणी कामाला असते, आणि तिच्यात तो गुंतत जातो...हे अजरामर चित्र काढतो. २००३ मध्ये या कादंबरीवर आधारित, त्याच नावाचा चित्रपटही निघाला. या चित्रपटात ‘गर्ल’ अर्थात ग्रीट या मोलकरणीचे काम स्कार्लेट जोहान्सन या सुप्रसिद्ध नटीने केलेले आहे. चित्रपटात ती हुबेहुब पेंटिंगप्रमाणे दिसते. खरं तर त्यानंतरच या चित्राबद्दलचं लोकांचं कुतुहलही प्रचंड वाढलं. आज हे चित्र नेदरलँडमधील ‘हेग’ या ठिकाणी ‘मॉरिच्युअस’ या कलासंग्रहालयात ठेवलेलं आहे. त्या भव्य इमारतीच्या बाहेरून याच चित्राचं एक प्रचंड मोठं कापडी ‘बॅनर’ लावलं आहे... खास आकर्षण म्हणून!...हे भाग्य तर ‘मोनालिसा’च्याही नशिबी नाही.- अॅड.सुशील अत्रे
‘गर्ल विथ अ पर्ल ईअररिंग : छोटी मोनालिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:40 PM