लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हतारपणाच्या काठीचा आधार म्हणजे मुलगा, असा सर्वसाधारण समज जनमानसात आहे. त्यामुळे काही नसले तरी मृत्यूनंतर खांदा द्यायला अन मुखाग्नी द्यायला तरी मुलगा हवाच हा सामान्य माणसाचा आजही समज आहे. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठ मुलींनी खांदा व अग्नीडाग देवून हा पारंपारिक समज खोटा ठरवला असल्याचे दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे. या घटनेने ‘त्या’ आठ मुलींनी समाजासमोर समतेचा संदेश दिला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामसेवक निंबा झिपरु माळी यांच्या पत्नी गं. भा. भिमाबाई निंबा माळी यांचे १० रोजी रात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आठ मुली, जावई व नातवंडे असा परिवार होता.
त्यांच्या नशिबी मुलगा नव्हता. भिमाआईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या आठही मुलींचे शिक्षणदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी कुठलीही कसर त्यांनी सोडली नाही. आठही मुली आपल्या संसारात सुखी आहेत. शालिनी चौधरी, अनिता माळी, मंगल रोकडे, प्रतिभा महाजन, शोभा माळी, अन्नपुर्णा बोरसे, संगीता माळी, उर्मिला माळी या आठ मुलींनी बुधवारी दुपारी आई भिमाबाई माळी यांच्या पार्थिवाला खांदा व अग्निडाग दिला.