मुक्ताईनगर, जि. जळगाव : जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यर्थिनींनी ‘ बंध रेशमाचे, राखी सैनिको के नाम’ या उपक्रमातून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात सैनिकांसाठी ९५ विद्यर्थिनींनी राख्या व हस्तलिखित शुभेच्छा पत्र पाठविले आहेत. या उपक्रमाद्वारे सैनिक बांधवांना राखीची भेट पाठविण्यासाठी विद्यार्थिनींमध्ये अपूर्व असा उत्साह होता.राखीपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक भावाला बहिणीची आठवण येतेच. पण अनेकांना कामामुळे बहिणीला भेटता येत नाही. अशावेळी व्हिडीओ कॉल, फोन, मेसेजच्या माध्यमातून राखीपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र सैनिकांना प्रत्येकवेळी बहिणीशी बोलणे शक्य होतेच असं नाही. सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधण्यासाठी येणे शक्य होत नाही. सैन्यातील भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, आणि देशसेवेसाठी सीमेवर असलेल्या सैनिक बांधवांना राखी व शुभेच्छा पत्रातून स्फूर्ती आणि बहिणीच्या मायेचा ओलावा मिळावा. त्यांचा हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता नववी व दहावीच्या तब्बल ९५ विद्यार्थिनींनी राखी आणि स्वत:च्या हाताने लिहिलेले शुभेच्छा पत्र सैनिकांसाठी पाठविले. विद्यार्थिनींनी सैनिक भावांसाठी पाठवलेली ही भेट प्रथम अठरा महाराष्ट्र बटालियन यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तेथून ही राखी पौर्णिमेची भेट सीमेवरती थेट सैनिकांना पाठवली जाणार आहे. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक केले जात आहे.
सीमेवरील जवानांसाठी मुक्ताईनगरातून विद्यार्थिनींनी पाठविल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:40 PM
आपल्या देशाच्या सीमेवर चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या जवांनाना बहिणीच्या मायेचा ओलावा लाभावा म्हणून मुक्ताईनगरातील जे.ई. स्कूलमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या ९५ विद्यार्थिनीनी ‘बंध रेशमाचे’ या उपक्रमांतर्गत राख्या पाठविल्या आहेत. सोबत या जवानांसाठी शुभेच्छा पत्र देखील रवाना केले आहे.
ठळक मुद्देविद्यार्थिंनींचे शहरवासियांकडून कौतुक शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेतून साकारला उपक्रम