जळगाव : जामनेर येथे भाचीच्या लग्नासाठी गेलेल्या जिनेंद्र मधुकर सैतवाल (४७) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले २० हजार रुपये रोख व पत्नीचे दागिने असा १ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना कानळदा रस्त्यावरील राधाकृष्ण नगरात रविवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनेंद्र सैतवाल हे न्यू वेअर हाऊसिंग कॉलनी येथे नोकरी करतात. पत्नी कविता, मुलगी साक्षी व आर्या यांच्यासह ते कानळदा रस्त्यावरील राधाकृष्ण नगरात वास्तव्याला आहे. मुलगी साक्षी हिचे ७ मार्च रोजी लग्न असल्याने त्याची संपूर्ण खरेदी सैतवाल यांनी केलेली होती, १५ फेब्रुवारी रोजी बहिणीच्या मुलीचे जामनेर येथे लग्न असल्याने परिवारासह ते शनिवारी सायंकाळी घराला कुलूप लावून त्यांच्याकडे गेले. रविवारी सकाळी ९.३० वाजता घराशेजारी राहणाऱ्या वैशाली कैलास पाटील यांनी सैतवाल यांना फोन करून घराचा दरवाजा उघडा असून चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार सैतवाल दांपत्य लागलीच घरी आले असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता तर किचनमधील डबे खाली पडलेले होते व इतर साहित्यही अस्ताव्यस्त होते. बेडरूमधील कपाट उघडे होते. त्यात मुलीच्या लग्नाचे २० हजार रुपये, ९३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ८ हजार ६०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ३७ हजार रुपये किमतीचा घागरा, साड्या असा एकूण १ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सैतवाल यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.