जळगाव - जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. जळगावजवळ सोमवारी (11 मार्च) दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गीतांजली एक्स्प्रेस शिरसोली रेल्वे स्थानकातून जात असताना शेवटच्या डब्याला आग लागली असल्याचे शिरसोली येथील गेटमनच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. त्यानंतर शिरसोलीपासून काही अंतरावर ही गाडी थांबविण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करुन आग विझवण्यात आली आहे. यानंतर आगग्रस्त डबा वेगळा करुन गाडी जळगावकडे रवाना करण्यात आली.
मनमाड रेल्वेस्थानकावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना होत असताना याआधीही काही महिन्यांपूर्वी रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला होता. गाडी क्रमांक 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसला मनमाड रेल्वेस्थानकावर थांबा नाही. गाडी नाशिकहून निघाल्यानंतर थेट भुसावळला थांबते. गाडी मनमाड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 2 वरून वेगात रवाना होत असताना स्टेशन मास्तर कार्यालयासमोर मोठा आवाज झाला होता. त्यामुळे फलाटावरील प्रवाशांमधे संभ्रम निर्माण झाला. फलाटावरील विक्रेत्यांनी ही माहिती स्टेशन मास्तर कार्यालयात दिल्यानंतर युद्धपातळीवर रुळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन अर्ध्या तासात दुरुस्ती करण्यात आली होती.