जळगाव (कुंदन पाटील) : गृह कर्जापोटी काढलेल्या विमा पॉलिसीमध्ये मयताला असलेल्या आजाराचा समावेश नाही, असे कारण देत संबंधित कंपनीने भरपाई नाकारली. त्यावर दाखल तक्रारीत ग्राहक मंचाने सुनावणी करीत मयताच्या वारसांना सुमारे ९ लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकाश मोतीराम खैरनार (रा.म्हसवे शिवार, पारोळा) यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २०१७ मध्ये आठ लाखांचे गृहकर्ज घेतले होते. त्यापोटी संबंधित कंपनीने एक विमा काढला होता. कर्जापोटी नियमित हप्ते भरत असताना खैरनार यांना कोरोना आजाराने घेरले. त्यांना तातडीने धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत प्रकाश खैरनार यांच्या पत्नी रेखा, मुलगा निरजकुमार व मुलगी हिमानी यांनी भरपाई मिळावी म्हणून संबंधित विमा कंपनीकडे दाद मागितली आणि क्लेम दाखल केला.कोविड-१९ हा आजार पॉलिसीमध्ये समाविष्ट नसल्याने व हा आजार गंभीर नसल्याने क्लेम नामंजूर केला. त्यानंतर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर तक्रारदारातर्फे ॲड. हेमंत भंगाळे यांनी आकस्मिक आजारामध्ये कोविड-१९ या नवीन आजाराचा समावेश करण्यासंदर्भात राज्य शासनाचा निर्णय व उच्च न्यायालयाचे दाखले सादर केले. त्यानंतर आयोगाने सुनावणी केली.
अशी मिळणार भरपाई
ग्राहक आयोगाचे अध्यक्ष श्रीमती सी आर सपके, सदस्य एस ए माणिक व ए जी मणियार यांनी दिलेल्या आदेशानुसार विमा पॉलिसीपोटी ८ लाख ७३ हजार १३ रुपये द्यावेत. तसेच तक्रार दाखल झाल्यापासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत ६ टक्के व्याज दराने व मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रुपये दहा हजार, खर्चापोटी रुपये पाच हजारांची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.