लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बेड मॅनेजमेंटसह आयसीयुमधील गंभीर रुग्णांच्या प्रकृतीचे अपडेट ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २४ शिक्षकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या शिक्षकांना कुठलेही अनुभव नाही तर प्रशिक्षण सुध्दा मिळालेले नाही. त्यामुळे नियुक्त केलेल्या शिक्षकांना ५० लाख रुपयांचा विमा कवचासह संपूर्ण सुविधा मिळाव्यात, अशी मागणी विविध शाळांमधील शिक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२४ शिक्षकांची जीएमसी रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांवर रुग्णाचे ॲडमिट मॅनेजमेंट पाहणे, रुग्णांना तत्काळ प्रवेश कामी मदत करणे तसेच रुग्णांना आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी मदत करणे, नातेवाइकांमध्ये समन्वय साधून माहिती पुरविणे, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची दक्षता घेणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नियुक्त केलेल्या शिक्षकांना कुठलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही व वैद्यकीय क्षेत्रातील कुठलेही अनुभव नाही. त्यामुळे नियुक्त केलेल्या शिक्षकांना फ्रंटलाईन वर्करच्या सुविधा देण्यात याव्यात. तसेच पन्नास लाख रुपयांचा विमा कवच द्यावा व बाधित क्षेत्रात काम केल्यामुळे विलगीकरणात राहाणे अत्यावश्यक असल्यामुळे राहण्याची व जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, हॅण्डग्लोज, हेडकॅप, सॅनिटाईझर, पीपीई किट व त्याच्या वापराबाबत शास्त्रीय माहिती मिळावी, तर शिक्षकांना लसी देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर पंकज अंभोरे, जगतसिंग कचवे, राजेंद्र आंबटकर, अशोक बावस्कर, राजेंद्र पाटील, सुधाकर गायकवाड, रामकृष्ण पाटील, दीपक कुळकर्णी, गौरव भोळे, किशोर जाधव, सुनील ताडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.