अमळनेर : रुग्णाला जिवंत करून द्या, असे म्हणत ग्रामीण रुग्णालयात दोघांनी गोंधळ घालत तोडफोड केली. हा प्रकार 22 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार ताडेपुरा भागातील बापू सुभाष भालेराव (30) याने 22 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामीणमधील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, मयताचे नातेवाईक सागर चंदनशिव व मनोज चंदनशिव यांनी ग्रामीण रुग्णालयातच रुग्णाला जिवंत करून द्या, म्हणून गोंधळ घातला. आरडाओरड करून आरोग्यसेविका योगिता शिवाजी हजारे यांच्या अंगावर साहित्य मारून फेकले. तसेच महिला वॉर्ड, प्रयोगशाळा, डॉक्टरांच्या कक्षात खुच्र्या, साहित्य फेकून, खिडक्यांच्या काचा फोडल्या. शिवीगाळ व दमदाटी केली. आरोग्यसेविका हजारे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध भादंवि कलम 353,427,504,506, 34 प्रमाणे शासकीय कामात अडथळा, नासधूस, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच वैद्यकीय सेवा मालमत्ता नुकसान कलम 3(2),2010,1884 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पीएसआय देवीदास बि:हाडे करीत आहेत. (वार्ताहर)
रुग्णाला जिवंत करून द्या म्हणत ग्रामीण रुग्णालयात दोघांचा धिंगाणा
By admin | Published: April 24, 2017 1:19 AM