मुक्ताईनगर (जळगाव) : भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रविवारी दुपारी आगमन झाले. त्यावेळी खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले. याप्रसंगी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे व कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. नाथाभाऊंच्या राजकीय पुनर्वसनामुळे खडसे कुटुंबीयांना आनंद झाला आहे. त्यामुळेच, मंदाकिनी खडसेंनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, देवी दसऱ्यानिमित्त देवी मुक्ताईचे दर्शन घेऊन साकडे घातले.
खडसे यांनी भाजपातूनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते. तर रक्षा खडसे यांनी ही भाजपात राहणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आजचा प्रसंग बाका होता खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आणि घरी भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्याकडून औक्षण करून स्वागत असे चित्र रविवारी दुपारी पहायला मिळाले. आज प्रथमच खडसेंच्या स्वागतला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते. दरवर्षी दसऱ्यादिवशी भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी नाथाभाऊंच्या घरी असायची. मात्र, दोनच दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं वेगळंच चित्र मुक्ताई नगर येथे पाहायला मिळालं.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा आनंद त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही झाला असून त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, म्हणजे दसऱ्याच्या अगोदरच सीमोल्लंघन झालं. दसऱ्यानिमित्त राज्यातील सर्वांनाच माझ्याकडून शुभेच्छा. आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाऊंना भेटत आहेत, पण आजपर्यंत भाऊंनी कधीच कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी अन् भाजपा असा भेदभाव केला नाही, कार्यकर्ता हा भाऊंचा कार्यकर्ता आहे. मुक्ताईचे आशीर्वाद आम्हाला खूप लाभले आहेत. ज्यांनी भाऊंवर अन्याय केला, त्यांना मुक्ताईने सद्बुद्धी देवो, हीच मागणी. या अन्याय करणाऱ्यांनी कारण जाहीरपणे सांगावं? असे आव्हानही मंदाताई खडसेंनी भाजपा नेत्यांना दिलंय.