जळगाव: ज्याच्या हातात कला आहे, जीव ओतून काम करण्याची तयारी आहे व कल्पकतेचा भाव आहे, अशीच व्यक्ती आज जगाला नवीन काही देऊ शकते. आज जगाला जे हवे आहे ते पुस्तकातून येणार नाही. तुमच्याकडे बहिणाबाईचा वसा आहे. जो पुस्तकातून नाही तर ºहदयातून आला आहे. तो वसा चालविण्याची गरज आहे. खान्देशी खाद्यपदार्थांना जागतीक बाजारपेठ मिळवून द्या. कारण हे पदार्थ बनविण्याची कला फक्त खान्देशी महिलांच्याच हातात आहे. त्यामुळे महिलांनी उद्योजक म्हणून पुढे येत खान्देशी पुरणपोळी देखील अॅमेझॉनमार्फत न्यूयॉर्कला पोहोचविली पाहिजे, असे प्रतिपादन माणदेशी महिला ग्राम सहकारी बॅँक या ग्रामीण महिलांसाठी चालविलेल्या पहिल्या महिला बॅँकेच्या संस्थापक चेतना गाला सिन्हा यांनी केले.मंगळवार, १३ मार्च रोजी सकाळी कांताई सभागृहात केसीई सोसायटीच्या आयएमआर कॉलेज व जिल्हा महिला असोसिएशन तर्फे आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नाहटा कॉलेजच्या प्राचार्य मिनाक्षी वायकोळे होत्या. व्यासपीठावर जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्ष राजकमल पाटील, आयएमआरच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या.प्रा.शमा सुबोध यांनी चेतना गाला यांचा परिचय करून दिला. तर राजकमल पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या मिनाक्षी वायकोळे यांनी सांगितले की, माणसाचा विकास दोन प्रकारे होतो. पहिला व्यक्तीगत विकास व दुसरा समाजाभिमुख व्यक्तीगत विकास. व्यक्तीगत विकासात शिक्षण, चांगले आरोग्य,आर्थिक स्वावलंबन यासाठीच्या प्रयत्नांतून साध्य होतो. तर जाणीव, जागृती, अधिकार, हक्क, जबाबदाºयांची ओळख यातून समाजाभिमुख विकास साध्य होतो. याच माध्यमातून संघटन कौशल्य शिकतो, असे सांगितले.अन् महिलांसाठी बँक उभी राहिलीचेतना गाला यांनी भाषणात त्यांच्या कार्याचा प्रवास सांगताना मुंबईतून प्राध्यापकाची नोकरी सोडून त्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड या गावात ग्रामीण भागातील महिलांसाठी काम करण्याकरीता रहायला आल्या. त्याचा किस्सा सांगितला. एका व्याख्यानाच्या निमित्ताने त्या या परिसरात आल्या. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने महिला रोहयोवर दगड फोडण्याचे काम करीत असल्याचे पाहिले. जन्मठेपेच्या कैद्यांना दगड फोडण्याचे काम दिले जाते. ते काम या महिला करीत असल्याचे पाहून त्यांनी बदल घडविण्यासाठी या भागात काम करायचे ठरविले व तेथे रहायला आल्या. महिलांसाठी काम सुरू केले. १९९५ मध्ये एका महिलेने त्यांच्याकडे येऊन ताडपत्री घेण्यासाठी बचत करायची असल्याचे सांगितले. त्या महिलेला घेऊन त्या अनेक बँकांमध्ये फिरल्या. मात्र दररोज ३ रूपये बचत करण्यासाठी खाते उघडणे परवडणारे नसल्याचे बँकांचे म्हणणे होते. तेव्हा या महिलांसाठी स्वत:ची बँक उघडण्याचे ठरविले. थेट रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचीच भेट घेतली. त्यानंतर अधिकाºयांनी माहिती दिली. मात्र पहिला प्रस्ताव त्यावरील सर्व संचालक महिलांचे अंगठे असल्याने रिझर्व्ह बँकेने नाकारला. मात्र त्या महिलांनी साक्षरतेचे धडे घेत सहा महिन्यातच दुसरा प्रस्ताव देऊन बँकेची परवानगी मिळविली. आज ही बँक १७० कोटींची उलाढाल करते. ४ लाख महिला सभासद आहेत. तर अशिक्षीत जेमतेम दहावीपर्यंत शिक्षीत महिला संचालिकाच या बँकेचा कारभार पाहत असल्याचे सांगितले.बचतगटांचा उच्च शिक्षणाला हातभारचेतना गाला यांनी सांगितले की, देशात ७५ लाख बचतगट आहेत. ग्रामीण भागात या बचतगटांमुळेच उच्च शिक्षणाला हातभार लागत आहे. ग्रामीण भागातील महिला मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी बचतगटांकडूनच मदत घेतात, असे सांगितले.खाद्यपदार्थांचा व्यवसाय चांगलाचेतना गाला म्हणाल्या की, लोक खाण्यावर भरपूर पैसे खर्च करतात. त्यातच ‘प्रोटीन’या घटकाला सध्या खूपच महत्व आले आहे. त्यामुळे प्रोटीन भरपूर असलेले आपल्याकडील पदार्थ शहरी भागात उपलब्ध करून द्या. नाचणीचे पापड, नाचणीचे लाडू अशा पदार्थांना मुंबईतील महोत्सवांमध्ये प्रचंड मागणी असते. अॅमेझॉनवरही त्याला डिमांड असते, असे सांगितले. त्यामुळे महिलांनी हिंमत बाळगून उद्योग उभारावेत. साथ आपोआप मिळते, असे सांगितले.
खान्देशी खाद्यपदार्थांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्या- चेतना गाला सिन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 4:29 PM
आयएमआरतर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन
ठळक मुद्दे खाद्यपदार्थांचा व्यवसाय चांगला अन् महिलांसाठी बँक उभी राहिली बचतगटांचा उच्च शिक्षणाला हातभार