चाळीसगाव : शहरातील इस्लामपुरा भागात नाला स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या, मात्र जेसीबी नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. यावर उपार म्हणून एकाने चक्क खेळण्यातील जेसीबीच नगरपालिकेला भेट दिले.
चाळीसगाव शहरातील इस्लामपुरा नवागाव शनिमंदिरासमोरील नाल्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत नगरपालिकेला वेळोवेळी कळवूनही कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. यावर ‘मेरा गाव मेरा तीर्थ’ या अभियानाचे मुख्य प्रवर्तक विजय शर्मा यांनी नगरपालिकेला चक्क खेळण्यातील प्लास्टिक जेसीबी भेट दिले.
हा नाला स्वच्छ करण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवेदन व तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र दरवेळी जेसीबी नसल्याचे कारण सांगून नगरपालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे शर्मा यांनी प्लास्टिकचे जेसीबी पालिका उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांना भेट दिले. याप्रसंगी खुशाल पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओेळ
चाळीसगाव नपा उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांच्याकडे प्लास्टिक जेसीबी मशीन देताना विजय शर्मा, सोबत खुशाल पाटील, किशोर पाटील.