ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13 - शहरातील मोहाडी रस्त्यालगत 70 हेक्टरवर पसरलेल्या लांडोरखोरीच्या निसर्गरम्य वनापैकी 12 हेक्टर जमिनीवर उभारलेल्या लांडोरखोरी उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून ते नागरिकांना खुले करण्यात आल्यानंतर त्यास नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आतार्पयत 36 लोकांनी वार्षिक पास काढले आहेत. या उद्यानाच्या उद्घाटनास 14 सप्टेंबर रोजी महिना पूर्ण होत आहे. त्यापाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने आढावा घेतला असता, ही माहिती मिळाली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खाद्य पदार्थ, अपूर्ण असलेला ट्रॅक पूर्ण झाल्यास आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा सूरही उमटत आहे.सकाळ व संध्याकाळ मिळून 5 ते 7 हजारांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून येत आहे. म्हणजेच सुमारे 250 ते 300 लोक दोन्हीवेळ मिळून भेट देतात. त्यात लहान मुलांचाही समावेश असतो. सुटीच्या दिवशी मात्र हीच संख्या 1 हजारार्पयत जाते. 10 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सकाळ व संध्याकाळ मिळून तिकीट विक्रीतून सुमारे 10 हजार रूपयांचे उत्पन्न वनविभागाला मिळाल्याची माहिती मिळाली. या उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर वनमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या उद्यानाचे उद्घाटन झाले नव्हते, त्यामुळे ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले नव्हते. त्यामुळे शहरवासी व वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर त्याची दखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती व 14 ऑगस्ट रोजी या उद्यानाचे त्यांनी उद्घाटन केले होते व नागरिकांसाठी हे उद्यान खुले केले होते. स्वास्थ संकल्पनेचाही या उद्यानाच्या निर्मितीत अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळेच मॉर्निग वॉक व जॉगिंगसाठी मातीचा ट्रॅक करण्यात आला आहे. तसेच निसर्गाच्या सान्निध्यातच खुल्या व्यायामशाळेचा (ओपन जीम) लाभही नागरिकांना घेता येत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.उद्यानाची वेळ सकाळी 5 ते 9.30 व दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 र्पयतच आहे. मात्र बहुतांश नागरिक हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिरायला निघतात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. मात्र सुटीच्या दिवशी जर दुपारच्यावेळी तसेच सायंकाळी आणखी तासभर वेळ वाढविल्यास या उद्यानाला आणखी प्रतिसाद मिळू शकेल.