लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात स्वच्छतेसह विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील ४५ गावांचा आर. आर. (आबा ) सुंदर गाव पुरस्कार योजनअंतर्गत येत्या १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेतर्फे गौरव करण्यात येणार आहे. यात तालुकास्तरावर १० लाखांचे तर जिल्हास्तरावर निवड झालेल्या एका गावाला ४० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
या गावांच्या प्रस्तावानंतर बुधवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या समितीने या गावांची पाहणी करून त्यांची नावे जवळपास निश्चित केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथिनिमीत्त या पुरस्कांराचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून निधी आणि कोरोना या कारणामुळे हे पुरस्कार रखडले होते, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांनी दिली. दरम्यान, गर्दीची शक्यता लक्षात घेता येत्या मंगळवारी होणारा पुरस्कार कुठे घ्यावा, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनातर्फे लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
हे आहेत निकष
वैयक्तिक शौचालयांची संख्या, सामूहिक शौचालये, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शाळांमधील सुविधा आदी विविध बाबीं या पुरस्कार योजनेत गुण ठरवून देण्यात आले आहेत. या क्षेत्रात ज्या गावांची कामे चांगली अशा गांवाना समितीच्या पाहणीनंतर पुरस्कार जाहीर करण्यात येत असतो. बक्षीस मिळाल्यानंतर ती बक्षीसाची रक्कम खर्च करण्यासाठीही निकष घालून देण्यात आले असून यात स्वच्छतेबाबत, महिला मुलांसाठी, अपारंपारिक उर्जा संबधी, भागौलिक माहिती प्रणाली बसविणे आदी बाबींवर ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे.