लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनात रुग्णसंख्या वाढल्याने सर्वत्र व्हेंटीलेटरचा अभाव व रुग्णांची नातेवाईकांची धावाधाव सुरू होती. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला बुधवारी पीएम केअरकडून दहा व्हेंटीलेटर प्राप्त झाले असून याचे गुरूवारी इन्स्टॉलेशन सुरू होते. समितीकडून लवकरच याचे नियाेजन करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागातील सर्व बेडला व्हेंटीलेटर लावण्यात आले आहे. शिवाय काही कक्षात गरजेप्रमाणे व्हेंटीलेटर लावले जात आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता भासत असल्याने जिल्ह्यात अनेक वेळा व्हेंटीलेटर मिळत नसल्याने रुग्णांची मोठी फरफट होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. परिस्थिती अत्यंत बिकट असून गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉ. जितेंद्र सुरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व्हेंटीलेटरच्या नियोजनासाठी जीएमसीत स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती लवकरच या व्हेंटीलेटरचेही नियोजन करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले. पीएम केअर कडून गेल्या वर्षीही काही व्हेंटीलेटर प्राप्त झाले होते. पुन्हा या वर्षी हे दहा नवीन व्हेंटीलेटर प्रथमच प्राप्त झाले आहे.
ट्युब् टाकावी लागणार
व्हेंटीलेटर हे दोन प्रकारचे असतात एकाद्वारे थेट मास्क लावून ऑक्सिजन पुरविता येतो. तर दुसऱ्या प्रकारात रुग्ण जेव्हा श्वास घेऊच शकत नाही, त्यावेळी त्याच्या घशात ट्युब टाकून या व्हेंटीलेटरच्या माध्यमातून फुफ्फुसाचे काम केले जाते. या व्हेंटीलेरच्या वापरासाठी ट्युबचा वापर करावा लागणार आहे. गुरूवारी सकाळी दोन अभियंता दाखल झाले होते. अधिष्ठाता यांच्या कॅबिन समोरील सभागृहात या व्हेंटीलेटरचे सांयकाळपर्यंत इन्टॉलेशनचे काम सुरू होते.
आधीचे व्हेंटीलेटर ९४
नवीन आलेले व्हेंटीलेटर १०