लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या टॉप टेन जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागावरही प्रचंड ताण वाढला आहे. जिल्ह्यात शेकडो, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ७० कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
दररोज हजाराच्या वर कोरोनाबाधित रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून येत आहेत. त्यांच्यावर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (जीएमसी) सुमारे ३४६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, याठिकाणी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जीएमसीत सुमारे ७० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये २० डॉक्टर्स, ३० स्टाफ नर्स व २० बेडसाइड सहायकांचा समावेश आहे. सद्य:स्थितीला तीन ते चार एमडी डाॅक्टर जीएमसीत आहेत. मात्र, आणखी पाच एमडींचीदेखील गरज असल्याचे जीएमसीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टची संख्या वाढल्यास चाचणीची संख्याही वाढेल व तात्काळ अहवाल मिळविण्यासही मदत होईल, असेही काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
७२ तासांच्या आत मरण पावणारे सर्वाधिक
कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर रुग्णाला तात्काळ उपचारार्थ दाखल केले जाते. दरम्यान, उपचारापासूनच्या ७२ तासांच्या आत मरण पावणाऱ्यांची संख्या ही दीड महिने पाहता सर्वाधिक आहे. सहा तासांत मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे ११ टक्के आहे. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असेल, तर रुग्णावर तात्काळ उपचार मिळण्यास मदत होते.
==================
-कोट
सद्य:स्थितीत जीएमसीत ७० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये स्टाफ नर्स, डॉक्टर व बेडसाइड सहायकांची सर्वाधिक गरज आहे.
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
===================
- आवश्यक कर्मचारी
डॉक्टर्स : २०
स्टाफ नर्स : ३०
बेडसाइड असिस्टंट (सहायक) : २०
===================
जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह- ८२,७२०
एकूण बरे झालेले बाधित- ७४,१९८
एकूण मृत्यू- १,५८३
उपचार सुरू असलेले बाधित संख्या : ६,९१६