लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही कक्षात कोविडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल न करता ते थेट या ठिकाणी पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्ण वाढल्यास काय, असा प्रश्न स्थानिक डॉक्टरांसमोर आला असून याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात चार इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. रुग्ण घटल्याने यातील एकच इमारत सुरू होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण कमी असल्याने या ठिकाणी रुग्ण दाखल न करता रुग्णांना थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. दरम्यान, दाखल रुग्णांपैकी मोठ्या प्रमाणात रुग्ण हे लक्षणे नसलेले असून हे रुग्णालय केवळ गंभीर रुग्णांसाठी असतातना असे रुग्ण या ठिकाणी येतात कसे, त्यामुळे बेड अडकून पडत असून गंभीर रुग्ण आल्यास काय करायचे, असा पेच आता डॉक्टरांसमोर आला आहे.
रुग्णांची फिरवाफिरव
रुग्ण बाधित आल्यानंतर त्याला नक्की पाठवायचे कुठे हाही एक पेच उभार राहिला आहे. थेट सिव्हील सांगितल्यानंतर रुग्णांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. त्यातच दोन दिवसांपासून काही रुग्णांची फिरवाफिरव होत असल्याचेही चित्र आहे. कमी रुग्णांसाठी मोठी यंत्रणा अडकवून ठेवणे योग्य नाही, म्हणून हे रुग्ण सिव्हीलला पाठविण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
कोट
कोविड केअर सेंटर बंद नाही, गरज पडल्यास त्या ठिकाणी रुग्ण दाखल करता येतील. मात्र, आता रुग्ण कमी असल्याने पूर्वीप्रमाणे सिव्हीलला दाखल करण्यात येत आहेत.
- राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी