लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णसंख्या नियमित ११०० पेक्षा अधिक समोर येत आहे. यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत असून दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. यातच ऑक्सिजनचे प्रमाणही वाढले आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिवसाला ८ लिक्विड ऑक्सिजन लागत असून ही आतापर्यंत सर्वाधिक मागणी आहे.
गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेत ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान, एका दिवशी सर्वाधिक ११०० जम्बो सिलिंडरची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर त्यापेक्षा कमी सिलिंडर लागत होते. शिवाय त्यावेळी ऑक्सिजन टँक नसल्याने याची जबाबदारी असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस एक करून या पुरवठ्याकडे लक्ष द्यावे लागत होते. त्यानंतर वाढणारी मागणी लक्षात घेता लिक्विड ऑक्सिजन टँक कार्यान्वयीत करण्यात आला. आता रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून ८ मेट्रिक टन इतक्या लिक्विडची ऑक्सिजनसाठी रोज आवश्यकता भासत आहे. हे सोडून अन्य काही कक्षांमध्ये सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे दिवसाला आता ही संख्या १२०० सिलिंडर पर्यंत गेली आहे. टँक असल्याने पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे. बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल हे ऑक्सिजन समितीचे सचिव असून त्यांच्यावर याची प्रमुख जबाबदारी आहे.
जळगावाला अडचणी
लिक्विडच्या कंपन्या या मुंबई, पुणे आणि नागपूर येथे आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा मात्र मर्यादीत आहे. आतापर्यंत जळगावात पुरवठ्यावर परिणाम झालेला नसला तरी आगामी काळात मागणी वाढत राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पुरवठादाराने व्यक्त केली होती.
बर्फ काढण्यासाठी कसरत
टँकमध्ये लिक्विड भरल्यानंतर हे लिक्विड गॅस मध्ये रुपांतरीत करण्यासाठी व्हेपोरायझरमध्ये टाकण्यात येते. याचे गॅसमध्ये रूपांतरण होत असतना तापामानात घट होते व व्हेपोरायरझरच्या बाहेर बर्फ् साठतो. हा बर्फ अधिक वाढल्यास दबावावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वारंवार हा बर्फ काढावा लागतो. यासाठी दोन कर्मचारी सतत या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. वारंवार हा बर्फ काढत असतात. यासाठी प्रकाश सपकाळ व किशोर सोनवणे हे कार्यरत आहेत.