लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव :औषधींचा तुटवडा नसला तरी अनेक गंभीर आजांरावरील किंवा सामान्य विकारांवरील काही महागडी औषधी आताही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध होत नसून अशा रुग्णांना बाहेरून खासगीतून औषधी आणावी लागत असल्याने यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
कोविड रुग्णालयात नॉन कोविड सुविधा महिनाभरापासून सुरू झाली. यात उपचारांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासह सुरक्षा यंत्रणेवर अधिक लक्ष दिले जात असल्याचे सकारात्मक चित्र असले तरी मोठ्या विकारांच्या उपचांरांमध्ये पूर्णत: मोफत सुविधा अद्यापही रुग्णालयात सुरू नाही. काही मोठ्या शस्त्रक्रियांसाठी शासकीय शुल्क आकारले जाते. ज्या आजारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश नसतो, अशा आजारांसाठी हा शुल्क आकाराला जातो. यात काही आजारांच्या महागड्या औषधी येथे उपलब्ध नसल्याने काही रुग्णांशी चर्चा केल्यानंतर समोर आले आहे.
त्वचारोगावरील उपचारासाठी बाहेरून आणले औषध
एक रुग्णाला त्वचेचा विकार होता. या रुग्णाची तपासणी केल्यानंतर काही औषधी त्याला मिळाली मात्र, साधारण ९०० रुपयापर्यंतचा मलम आणि काही औषधी त्याला बाहेरून आणायला लावली. मात्र, यामुळे चांगला फरक पडत असल्याचे या रुग्णाने सांगितले.
हाडांच्या आजारांसाठी बाहेरून काही साहित्य घ्यावे लागत असल्याचे काही रुग्णांनी सांगितले.
एजंटचा वावर घटला
रुग्णालयात सुरूवातीला एजंटचा मोठ्या प्रमाणात वावर होता. मात्र, तो आता कमी झाल्याचे चित्र आहे. रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा तसेच सुटसुटीतपणा आणून एजंटला पूर्णत: रोखणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले होते. यात विशेष बाब म्हणजे दिव्यांग दाखल्यांच्या वेळी हे प्रकार रोखण्यात आल्याचे समोर आले आहे.
औषधींचा तुटवडा नाही
सध्या नियमीत आजारांवर व आपात्कालीन परिस्थीती आवश्यक सर्व औषधी मुबलक प्रमाणात असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या काळात हे संपूर्ण रुग्णालय कोविड झाल्यामुळे नॉन कोविड औषधींचे करायचे काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यात ही औषधी मुदतबाह्य होण्याची भीतीही निर्माण झाली होती. मात्र, आयुर्वेद महाविद्यालयालया ओपीडी सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ही औषधी देण्यात आली होती.
महागडी अॅन्टीबायोटीक उपलब्ध
शासकीय रुग्णालयात केवळ बेसीक औषधीच उपलब्ध असून अनेक महागड्या काही विशिष्ट आजारावरील औषधी उपलब्ध नसतात, असे काही रुग्णांकडून समजले, मात्र, अनेक महागड्या ॲन्टीबायोटीक औषधीही रुग्णालयात असतात, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.