लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिविर या इंजेक्शनचा खासगी यंत्रणेत प्रचंड तुटवडा असून रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट अधिकच वाढली आहे. यातच आता शासकीय यंत्रणेतही रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शासकीय रुग्णालयातही केवळ दोन दिवसांचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोज किमान पन्नास रुग्णांना रेमडेसिविर द्यावे लागत आहे. या ठिकाणी मात्र, पूर्ण निकष तपासून व योग्यवेळी योग्य वापर या इंजेक्शनचा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. योग्यवेळी वापर झाल्यास त्याचे परिणाम चांगले असल्याचे या ठिकाणच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जीएमसीत ९०० इंजेक्शन उपलब्ध होते. गेल्या दोन दिवसांतील वापरानंतर ते कमी झाले असून आता आगामी दोन किंवा तीन दिवस हे इंजेक्शन पुरतील, अशी माहिती आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आम्हाला मागणी किती हे कळवा असे सांगण्यात आले असून २० एप्रिलपर्यंत इंजेक्शन येऊ शकतात, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
रेमडेसिविरचा काळा बाजार सुरू
खासगी यंत्रणेत रेमडेसिविर उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. मात्र, हे इंजेक्शन अत्यंत चढ्या भावात काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. काही ठिकाणी तर १७ हजारांना हे इंजेक्शन मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाईकांनीही याबाबत माहिती दिली होती. आम्हाला रुग्णालयात इंजेक्शन मिळाले नाही, अखेर बाहेरून अधिकचे पैसे देऊन घ्यावे, लागले अशी माहिती त्यांनी दिली होती.