लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरात फिरताहेत, तर मग सावधान... चालताना तुम्ही मोबाइलवर बोलत असाल तर केव्हाच तुमचा मोबाइल चोरी जाऊ शकतो, किंवा गर्दीत हरवू शकतो. दिवसाला शहरात रोज चार ते पाच घटना अशा घडतात, परंतु पोलिसात दाखल होण्याचे प्रमाण अगदी नगण्यच आहे. शहरात वर्षभरात हजाराच्यावर मोबाइल चोरी किंवा हरविले असतील, पण पोलिसात केवळ २८ मोबाइल चोरी झाल्याची नोंद आहे. त्यातील १२ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभरात जळगाव शहरातून २८ मोबाइल चोरी झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. नागरिकाचा मोबाइल हरविला किंवा चोरीला गेला तर बहुतांश वेळा तक्रारदारच तक्रार द्यायला पुढे येत नाही. कोणी आलाच तर त्याच्यामागे ठाणे अंमलदाराकडून तोच आरोपी असल्याच्या अविर्भात प्रश्नांची सरबत्ती केली जाते. त्यामुळे तक्रार दाखल करण्यापूर्वीच अशी परिस्थिती आहे, तर दाखल केल्यानंतर आणखी काय परिस्थिती असेल असे समजून तक्रारदार तक्रार देणे टाळतो. त्यात आणखी मोबाइल सापडलाच तर तो मिळविण्यासाठी तक्रारदारला न्यायालयाकडे जावे लागते. उगाचच कटकट आणि फिरफिर नको म्हणून तक्रारदारच गुन्हा दाखल करीत नाही.
अलीकडे रस्त्याने चालणाऱ्या लोकांचे कानाला लावलेले मोबाइल चोरी होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यात खासकरून अल्पवयीन मुलांचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. शनी पेठ व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही टोळी पकडली होती. मात्र त्यानंतरही मोबाइल चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. पिंप्राळा व आठवडे बाजारातून मोबाइल चोरीच्या घटना वाढलेल्या असून रात्री घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडी असली तर त्यातून मोबाइल चोरीचे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.
बॉक्स
हजारो मोबाइलची चोरी
वर्षभरात हजारो मोबाइलची चोरी व हरविल्याची प्रकरणे घडली आहेत. बऱ्याच वेळा गुन्ह्यांचा आकडा वाढतो म्हणून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याऐवजी तक्रारदाराला हरविल्याचा दाखला दिला जातो. वर्षभरात पोलिसांनी पाचशेच्यावर मोबाइल शोधूनही दिलेले आहेत, तर काही मोबाइल गुन्हेगारांकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत.
बॉक्स
रात्रीच्या वेळी मोबाइल चोरीच्या घटना
सायंकाळी तसेच रात्री रस्त्याने फिरणाऱ्या महिला व पुरुषांचे मोबाइल लांबविण्याच्या घटना सर्वाधिक घडल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. काव्यरत्नावली चौक, पिंप्राळा बाजार, गांधी उद्यान व फुले मार्केट आदी भागात मोबाइल चोरीच्या घटना अधिक घडलेल्या आहेत. दुचाकीवरून येणारे तरुण मोबाइल लांबवितात.
जानेवारी : ५
फेब्रुवारी : ४
मार्च : ३
एप्रिल : ०
मे : ०
जून : ४
जुलै : २
ऑगस्ट : १
सप्टेबर : २
ऑक्टोबर : ४
नोव्हेंबर : ८
डिसेंबर : ५