जळगाव : २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत मला जनतेने आशीर्वाद देऊन सेवेची संधी दिली. आता पुन्हा माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या बद्दल मी जनतेचा ऋणी असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचेच आपले ध्येय आहे व राहणार अशी ग्वाही नवनियुक्त आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास दिलेल्या भेटीदरम्यान दिली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवित दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवार, २५ रोजी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. येणाºया काळात करण्यात येणाºया कामांची माहिती देण्यासह त्यांचे संकल्पही सांगितले. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आमदार भोळे यांचे स्वागत केले. या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद.... प्रश्न - निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आरोप केले तरीदेखील आपण शांत राहिलात व विजय खेचून आणला, हे कसे शक्य झाले? उत्तर - आपल्याला कोणी दगड मारला म्हणून त्याला पुन्हा दगड मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या दगडापासून आपले घर कसे बांधावे, याचा विचार व्हावा. मी ‘ईजी अॅप्रोॅच’ असणारा आमदार असल्याने मी सहज कोणालाही उपलब्ध होतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याबद्दल आपुलकी वाटते. मी सकाळी अनेकांना भेटतो, चहाच्या कट्ट्यावर लोकांसोबत चहा घेतो, कोणाच्याही सुख-दु:खात, धर्म कार्यात, लग्न सोहळ््यात सहभागी होतो. जनतेच्या भावनांचा आदर करीत आल्याने व केवळ निवडणुकीच्या काळात जनतेला न भेटता नेहमी त्यांच्या संपर्कात राहिल्याने मी जनतेला आपला वाटू लागलो व त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास व्यक्त केला. प्रश्न - निवडणुकीत शिवसेनेचे सहकार्य कसे राहिले? उत्तर - हो, शिवसेनेकडून संपूर्ण सहकार्य मिळाले. उलट जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील नेत्यांना जायचे असल्यास त्यांना आपण प्रचारासाठी जाऊ दिले. शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासह आपल्यालाही सर्वांनी सहकार्य केले. सोबतच आरपीआय व सर्वच मित्रपक्षांचेही योगदान राहिले. प्रश्न - मंत्रीपदाची आशा आहे काय? उत्तर - मी कधी काही मागत नाही. मला पक्षाने, शहराने अगोदरच खूप काही दिले आले. त्यामुळे मंत्रीपदासाठी आपण आग्रह करणार नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती स्वीकारेल. ही माझी भूमिका सुरुवातीपासून आहे. प्रश्न - महापालिकेच्यावतीने होणाºया कामांना वेळमर्यादा ठरवून देणे आवश्यक आहे ? उत्तर - हो, प्रत्येक कामासाठी वेळ ठरविलेला पाहिजे. मात्र काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे विलंब होत असतो. कोणाची तक्रार आली म्हणून तेथे गेले पाहिजे, ही पद्धतच बंद करायची असून कोठे काय अडचणी आहे, यासाठी शहरात जावून पाहणी करावी व प्रत्येक काम वेळेत व्हावे, या विषयी सूचना देणार आहे. प्रश्न - पुढील धोरण काय आहे? उत्तर - शहराचा विकास हेच आपले प्रथम प्राधान्य राहणार असून यात या पूर्वीच मोठा निधी आलेला आहे व बहुतांश कामांना मंजुरी मिळाली आहे, ते कामे मार्गी लावणार आहे. आता निवडणूक झाली, राजकारण संपले असून आता केवळ समाजकारण करण्यावर भर राहणार आहे. थोड्याच दिवसात शहरातील रस्त्यांचे चित्र पालटलेले दिसेल. गाळेधारकांचाही प्रश्न मार्गी लावला जाईल. राजकारण न करता विकास करणे हेच ध्येय राहणार आहे. शहरातील प्रत्येकाला विमा काढणार शहरातील प्रत्येक व्यक्तीचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार भोळे यांनी या वेळी केली. ज्याचे आधार कार्ड असेल अशा पाच ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येकाचा विमा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ध्येय - आमदार सुरेश भोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:55 AM