जळगाव : गोटीपुवा नृत्याविष्काराचा प्रचार आणि प्रसार हेच आपले ध्येय आहे आणि यावर चरितार्थ आहे. आजोबांचे हे कार्य रघुराजपूर येथील दशभुजा गोटीपुवा नृत्य परिषदेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा मानस आहे. मात्र सध्या ही पारंपरिक कलेवर असलेले कलाकार सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याचे गोटीपुवा नृत्य परिषदेचे बट कृष्णदास यांनी यांनी सांगितले.
बालगंधर्व संगीत महोत्सवात रविवारी गोटीपुवा नृत्य सादर करण्यात आले. यापथकाचे प्रमुख बट कृष्णदास हे पद्मश्री गुरू मागुनी दास यांचे नातू आहेत. मागुनी दास यांनी गोटीपुवा या नृत्याला जगन्नाथ मंदिरातून बाहेर आणण्यात मोठी भूमिका बजावली. पूर्वी हे नृत्य फक्त जगन्नाथ मंदिरात एकच कलाकार सादर करत होता. मात्र त्याला समूह नृत्याचे रूप देत आणि मंचावर सर्वांसमोर सादर करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यांचा वारसा सध्या त्यांचे मोठे पुत्र सिबेंद्र दास यांनी चालविला आहे. त्यांच्या जोडीला सिबेंद्र यांचे पुतणे बट कृष्णदास हेदेखील आहेत. जळगावला आलेल्या चमुचे प्रमुख असलेल्या बट कृष्णदास यांच्याशी लोकमतने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गुरू मागुनी दास यांनी या नृत्यप्रकाराला एक ओळख मिळवून दिली. त्यात नृत्यप्रकारातील कार्यासाठी त्यांना पद्मश्रीदेखील मिळाला. आमच्या गुरुकुलमध्ये ओडिशातून आलेली ४० मुले आहेत. पुरीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या रघुराजपूर येथे गुरुकुल चालते. गुरुकुलातील कलाकार जेथे नृत्य सादर करतात. त्या मानधनावरच सध्या हे गुरुकुलाचा आर्थिक गरजा भागवत आहोत. गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा सर्व खर्च याच माध्यमातून उचलला जातो. मात्र गोटीपुवासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. कोरोनाच्या काळात दहा महिने सर्व कार्यक्रम बंद होते. त्यामुळे आर्थिक ताणही बराच होता.’