स्टार ८२९
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गामुळे पुन्हा एकदा बंद झालेले देऊळ अनलॉकनंतरही उघडले नसल्याने भाविकांना भगवंताच्या भेटीची ओढ लागली असून ‘उघड दार देवा आता उघड दार देवा...’ असेच जणू आता भक्त म्हणू लागले आहे. यात भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व्यवस्थापनाच्यावतीनेही उपाययोजना करण्यात आल्या आहे. भाविक व पुजारी यांना ज्या प्रमाणे मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे, तशीच प्रतीक्षा मंदिर परिसरातील व्यावसायिकांना लागली आहे.
दर्शनापेक्षा बंदचा अधिक काळ
गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर धार्मिक स्थळेही बंद झाली. मंदिर उघडण्यासाठी तब्बल आठ महिन्यांची प्रतीक्षा भाविकांना करावी लागली होती. नोव्हेंबर महिन्यात धार्मिक स्थळे खुली झाली. मात्र त्यांनतर पुन्हा फेब्रुवारी २०२१पासून कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून पुन्हा निर्बंध लागू झाले. नोव्हेंबर ते एप्रिल असे पाच महिने धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली राहत नाही तोच पुन्हा गेल्या अडीच महिन्यांपासून ते पुन्हा बंद आहे. त्यामुळे दर्शनासाठी केवळ पाच महिने खुली राहलेली मंदिरं गेल्या वर्षापासून १० महिन्यांपेक्षा जास्त काळ बंदच आहे. या विषयी शहरातील श्री ओंकारेश्वर मंदिर परिसरात भाविक, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मंदिर उघडण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.
व्यावसायिक हवालदिल
भगवंताच्या भेटीची ओढ भाविकांना लागली तर आहेच, सोबतच मंदिर परिसरात पूजा साहित्यासह इतरही वस्तूंच्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा आहे. श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री, श्रावण सोमवार, मंदिर वर्धापन दिन या काळात येथे शिवभक्तांची मांदियाळी असते. मात्र गेल्या वर्षापासून मंदिर परिसरात शुकशुकाटच अधिक राहत आहे. यामुळे येथे व्यवसाय करणारे व्यावसायिक चांगलेच हवालदिल झाले आहेत.
किती दिवस कळसाचेच दर्शन?
गेल्या वर्षी तब्बल आठ महिने मंदिर बंद राहिल्याने दर्शन घेता येत नव्हते. मध्यंतरी मंदिर खुले झाले मात्र आता पुन्हा बंद असल्याने केवळ कळसाचे दर्शन घ्यावे लागत आहे. अजून किती दिवस बाहेरूनच दर्शन घ्यावे, असा प्रश्न पडतो.
- रामचंद्र महाजन, भक्त
वार्षिक उत्सवासह दर सोमवारी मी श्री ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतो. मात्र गेल्या वर्षी मार्च ते नोव्हेंबर व आता पुन्हा अडीच महिन्यांपासून मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही. मंदिर लवकर उघडावे, ही अपेक्षा आहे.
- राजेंद्र कुलकर्णी, भक्त
आर्थिक गणित कोलमडले
गेल्या वर्षी तब्बल आठ महिने मंदिर बंद राहिल्याने संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. त्यात श्रावण मासही गेला होता. आता पुन्हा निर्बंधामुळे मंदिर बंद असल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.
- कृष्णा पवार, व्यावसायिक
कोरोना संसर्गाने भीती वाढण्यासह खर्चही वाढला आहे, मात्र व्यवसाय ठप्प असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. मंदिर कधी सुरू होतात, याची प्रतीक्षा आहे.
- समाधान बाविस्कर, व्यावसायिक.
मंदिर व्यवस्थापनाकडून दक्षता
कोरोना संसर्ग कमी झाल्याने इतर व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. आता धार्मिक स्थळेही उघडण्यास परवानगी मिळावी, अशी अपेक्षा आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- जुगल जोेशी, श्री ओंकारेश्वर मंदिर संस्थान.