चोपडा : शिरपूर येथील वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कूलचे विमान दि. १६ रोजी वर्डी येथून सात किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वत रांगांमध्ये बिघाड झाल्याने कोसळले. त्यात पायलट नुरुल अमिन हे जागीच ठार झाले तर प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका लखन गुजर या बालंबाल बचावल्या. त्यांना वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी धडपड केली आणि त्यांची धडपड कामी आल्यानेच अंशिका यांना तातडीने उपचार मिळू शकले.
विमान पडल्याची सर्व घटना शेजारी नवाडची जमीन मिळालेले व प्रत्यक्ष शेतात काम करणाऱ्या आदिवासी बांधवांनी पाहिली आणि विमान पडले हे ज्या वेळेस त्यांना कळलं, त्यावेळेस सर्वप्रथम चार आदिवासी बांधवांनी त्याठिकाणी धाव घेतली. रमेश छबान बारेला, राजाराम बारेला, सुमाऱ्या बारेला, बिसन बारेला अशी त्यांची नावे आहेत. यांनी आवाज देऊन परिसरातील इतर आदिवासी बांधवांना बोलावले आणि अंशिका यांना वाचविण्यासाठी सुरुवात केली. सर्वप्रथम रमेश बारेला यांनी अंशिका यांना धीर दिला. त्यानंतर पाणी प्यायला दिले. त्यांना साथ दिली, ती सुमाऱ्या नानसिंग बारेला, बिसन कोतवाल बारेला, राजाराम गोहऱ्या बारेला, साईराम नानसिंग बारेला, एकनाथ इमल्या बारेला, राजल्या करमसिंग बारेला, नंदलाल हिरामण भील, प्रेमसिंग बारेला यांनी गुजर यांना वाचविण्यासाठी धडपड केली. राजल्या करमसिंग बारेला यांनी तर बांबू तोडला आणि त्या बांबूला विमलबाई भिल यांनी दिलेली साडीची झोळी बनवली आणि त्या झोळीमध्ये अलगदपणे अंशिका गुजर यांना ठेवून ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचविले.
या चारही आदिवासी बांधवांनी सर्वप्रथम जखमी अंशिका गुजर यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. रमेश बारेला याने अंशिका गुजर यांना पिण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या मोबाईलवरून त्यांना त्यांच्या वडिलांशी बोलायलाही लावले. त्यामुळे सोशल मीडियावर या चारही जणांना शौर्य पुरस्कार दिला जावा अशी मागणीही केली जात आहे.
रुग्णवाहिकेपर्यंत झोळीतून नेण्यासाठी विमलबाईंनी दिली साडी
सर्वप्रथम रमेश छभान बारेला याने जखमी अंशिका यांना पाणी प्यायला दिले. त्यानंतर विमानाचा चुराडा झाला असल्याने त्याच्यात त्यांचे दोन्ही पाय अडकले होते. परंतु तरीही सर्व आजूबाजूचे आदिवासी बांधव एकत्र येत यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून आणि अंशिका यांना दोन्ही पाय फ्रॅक्चर असल्याने दुखापत होत असतानाही शिताफीने बाहेर काढले आणि विमलबाई हिरामण भिल यांनी झोळी करण्यासाठी त्यांची साडी काढून दिली. या चारही आदिवासींना खऱ्या अर्थाने हिरो संबोधले जावे, अशा आशयाच्या पोस्ट सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत.
जीव वाचवण्यासाठी सुकनाथ बाबांचा जल्लोष
वर्डी (ता. चोपडा) येथील सुकनाथ बाबांचे श्रद्धास्थान असल्याने ज्यावेळेस झोळीतून अंशिका यांना आणण्यात आले, त्यांच्या जीवाला काहीही होऊ नये म्हणून सुकनाथ बाबांचा जयघोष करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले आणि वर्डी, विष्णापूर, तलाव परिसरातील अनेकांचे हात विमान अपघातसंबंधी लागले आणि तालुक्याची संकट समयी धावून जाण्याची सामाजिक सेवेची संस्कार शिदोरी या बदलत्या काळात ही टिकलेली असल्याचे दृश्य साऱ्यांनी पाहिले.
180721\18jal_9_18072021_12.jpg
अंशिकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे बिसन बारेला. रमेश बारेला आणि सुमाऱ्या बारेला.