या वर्षी मात्र १५ जानेवारीला मकरसंक्रांत येत आहे. यामुळेच या वर्षी प्रयागला होणारा कुंभमेळा देखील १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. यादिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी सूर्य दक्षिणायनातून ते उत्तरायणात प्रवेश करतो. महाभारतात भीष्माचार्यांनी आपला देह त्यागासाठी मकर संक्रांतीचा काळ निवडला होता.मकर संक्रांतच्या दिवशी महाराष्टÑात एकमेकांना तीळ, गुळ दिला जातो. विद्वानांच्या मते काही शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व देखील आहे. वारकरी परंपरेचे पाया, संत ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाच्या नामाला गोड म्हटले आहे. जसं मकर संक्रांतीच्या दिवशी ‘गोड गोड बोला’ हे म्हटल जातं, त्याच प्रमाणे वारकरी सांप्रदायात नेहमीसाठी म्हटल जातं.गोड तुझे नाम विठोबा आवडले मज । दुजे उच्चारिता मना वाटतसे लाज ।।संत ज्ञानेश्वर हे योगी परंपरेचे, संत नामदेवांनी त्यांचा गौरव करताना म्हटले आहे, साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली ।असे असतांना देखील संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, ‘गोड तुझे नाम’ विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की, त्याला उपमाच नाही, वारकरी परंपरा ही नामाच्या अधिष्ठानावर उभी आहे. संत ज्ञानोंबापासून तर संत निळोबारायापर्यंत सर्व वारकरी संतांनी नामालाच प्रधान मानले आहे. ज्ञानोबाचा नामावर सुलभ, सरळ आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ‘हरिपाठ’ प्रसिद्ध आहे. हरिपाठाचा गोडवा म्हणजे ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा।’ संत ज्ञानोबांनी तर एका अभंगात स्पष्ट केले.सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहता। नाम आठविता रुपी प्रकट पै झाला ।।ज्या दिवशी प्रेमाने श्री विठ्ठलाचे नाम आठवले, त्याच दिवशी तो प्रगट झाला आणि हाच सोनियाचा दिवस आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. संत निळोबाराय तर नाम आणि श्रीविठ्ठलाशिवाय काहीच मानत नाही.सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी भगवंताचे नाम हे कलियुगात महत्वाचे म्हटले आहे,श्री विठ्ठलाचे नाम इतकं गोड आहे की, आज हजारो वर्ष झाली तरी त्याची गोडी कमी झालेली नाही तर उलट वाढतच आहे आणि वाढतच राहणार. महाराष्टÑात वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा सांप्रदाय आहे. योग, याग, तप, यज्ञ वगैरे याला महत्व न देता फक्त नामाला महत्व आहे. संत निळोबांनी सांगितले आहे क ी,नेणती काही टाणा टोणा । कुठलाही धागा नाही, दोरा नाही फक्त श्रीविठ्ठलाचे नाम. संत तुकाराम महाराज म्हणतात,प्राणिया रे एक बीज मंत्र उच्चारी । प्रतिदिनी रामकृष्ण म्हण का मुरारीया अभंगाद्वारे संत तुकोबा, फक्त मानवालाच नाही तर सर्व प्राणीमात्राला सांगतात की, रामकृष्ण हा बीज मंत्र आहे आणि प्रतिदिन याचा आपल्या वाचेने उच्चार करा, यातच या कलीयुगात सर्वांचे कल्याण आहे. आणि हेच साधन उत्तम आहे. उपवास, धुम्रपान, पंचाग्नीसाधन वगैरे वारकऱ्यांसाठी नाही, असा बीज मंत्र सर्व संतांनी सांगितला आहे. कलीयुगात फक्त ‘हरिनाम’ हा एक उत्तम मार्ग आहे. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितले आहे.कृष्ण विष्णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।माझी आत्मयची । उदंड गाती ।। ज्ञानेश्वरी ।।या गोड गोड बोलण्याची दिवसांपासून। आपणही भगवंताचे गोड नाम घेण्यास सुरुवात करु या...- डॉ.कैलास पाटील, जळगाव
गोड तुझे नाम विठोबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 9:36 PM
विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की, त्याला उपमाच नाही
ठळक मुद्देकलीयुगात फक्त ‘हरिनाम’ हा एक उत्तम मार्ग आहे.