जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात वाहन चोरांनी चांगलाच हैदोस घातला आहे. दररोज सरासरी दोन ते तीन वाहनांची चोरी होत आहे. वाहन चोरटे जणू पोलिसांनाच आव्हान देत आहेत. जळगाव शहरात गोलाणी मार्केट व बी. जे. मार्केटसह दहा ठिकाणाहून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या भागात दुचाकी लावत असाल तर सांभाळा, अन्यथा वाहन होऊ शकते चोरी.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील गोलाणी मार्केट, बी. जे. मार्केट, नवीन बसस्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, सुप्रिम कॉलनी, तांबापुरा, भाऊंचे उद्यान परिसर, गिरणा टाकी परिसर, मू. जे. महाविद्यालय परिसर, संभाजीनगर आदी भागांमधून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन सुमारे ९० च्या वर दुचाकी जप्त केल्या होत्या. यानंतर वाहन चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या.
या भागात सर्वाधिक धोका !
- बी. जे. मार्केट
जुने व नवे बी. जे. मार्केट भागातून नेहमीच दुचाकी चोरीला जात असतात. या ठिकाणी चांगलीच गर्दी पहायला मिळते. याचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी पळवून नेतात. या भागात गॅरेज तसेच स्पेअर पार्टची दुकानेदेखील फार आहेत.
- नवीन बसस्थानक
नवीन बसस्थानक आवारात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. अशा गर्दीच्या भागात चोरट्यांचा अधिक वावर असतो. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी लांबविण्याचे प्रकार या ठिकाणी अधिक घडतात. अनेक जण बाहेरगावी जाण्याआधी बसस्थानक आवारात दुचाकी उभी करतात, नंतर पुढील प्रवास बसने करतात. हीच संधी पाहून चोरटे बनावट चावीने दुचाकीचे लॉक उघडून पसार होतात. त्यामुळे या भागात दुचाकी उभी करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
- गोलाणी मार्केट
मध्यवर्ती भागात असलेले गोलाणी मार्केट येथे सर्वाधिक मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकाने आहेत. त्यामुळे जिल्हाभरातून नागरिक येथे येतात. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी नागरिक दुचाकी उभी करतात. हीच संधी पाहून चोरटे या परिसरातून सर्वाधिक दुचाकी चोरून नेतात. शेकडो वाहने येथून चोरीला गेल्या आहेत. तसेच अग्निशमन विभाग कार्यालयाजवळील दत्त मंदिर परिसरातूनदेखील अनेक वाहने चोरीला गेली आहेत.
- भाऊंचे उद्यान, मू. जे. परिसर
काव्यरत्नावली चौक परिसरातील भाऊंचे उद्यानात अनेक नागरिक कुटुंबासह येत असतात. या ठिकाणी रस्त्यावर पार्किंगची सुविधा आहे. त्यामुळे वाहने उद्यानाबाहेर उभी असतात. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी घेऊन पसार होतात. त्यासोबत मू. जे. महाविद्यालय आवारातूनदेखील अनेक वाहने चोरीला गेली आहेत.