लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक कोंडी टळावी यासाठी सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेला दाणा बाजार व गोलाणी मार्केट हे दोन परिसर ‘वन वे’ घोषीत करण्यात आलेले आहेत. मात्र हे ‘वन वे’ नावालाच असून वाहन धारक पोलिसांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ‘वन वे’ चे उल्लंघन करणाऱ्या वर्षभरात ४३७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गोलाणी मार्केट परिसरात सतरा मजली इमारतीकडून हनुमान मंदिराकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. हनुमान मंदिराकडून वाहने शिवाजी रोड अर्थात सतरा मजली इमारतीकडे जावू शकतात. दाणाबाजारातही सुभाष चौकाकडून प्रवेशाला बंदी आहे. पोलन पेठ तसेच कॉग्रेस भवनकडून रस्ता बंद आहे. दोन्ही ठिकाणी ‘वन वे’ चे फलक लावण्यात आले होते, मात्र आता हे फलकही गायब झालेले आहेत. शनिवारी ‘लोकमत’ ने या भागात पाहणी केली असता ‘वन वे’ चे नियम कोणत्याच वाहनधारकाकडून पाळले जात नसल्याचे दिसून आले. चारचाकी, रिक्षा व दुचाकी असे तिनही प्रकारचे वाहने या मार्गावरुन जात होती.
वाहतूक नियम गुंडाळले
वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे पालनच होत नसल्याचे दिसून आले. शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने दाणाबाजार व सुभाष चौकात मोठी गर्दी होती. ट्रक मात्र पोलन पेठेकडून येत होते, इतर चारचाकी व दुचाकी चालकांकडून नियमांचे पालनच होत नव्हते. गोलाणी मार्केट परिसरातही हीच अवस्था होती. येथे तर कुठलाच नियम पाळला जात नाही. या भागात देखील शनिवारी मोठी गर्दी होती. रस्त्याच्याकडेलाच दुचाकींची पार्कींग करण्यात आली होती, त्यामुळे मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता.
वाहतूक पोलीस गायब
गोलाणी मार्केट व दाणा बाजार या दोन्ही ‘वन वे’ च्या ठिकाणी दोन वाहतूक पोलीस तैनात केले जातात. सुभाष चौकात पोलीस होते, मात्र गोलाणी मार्केट परिसरात एकही पोलीस नव्हता. या भागात कधीच पोलीस थांबत नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. दाणाबाजारात पोलीस असूनही ‘वन वे’ मधून वाहने जातच होती.
बेशिस्त पार्कींगमुळे वाहतूक कोंडी
गोलाणी मार्केट परिसरात हनुमान मंदिरापासून तर थेट सतरा मजली इमारतीपर्यंत रस्त्याच्याकडेला दुचाकी तर त्याला लागून चारचाकींची बेशिस्तपणे पार्कींग केली जाते. सुभाष चौकात तर विचारायलाच नको, तेथे पाय ठेवायला जागा नसताना मिळेल ते वाहन पार्कींग केले जातात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते.
वर्षभरात ४३७ जणांवर कारवाई
‘वन वे’ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३७ वाहनधारकांवर वर्षभरात दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली. दरम्यान, या भागात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गरजेनुसार पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. सुभाष चौक व दाणा बाजारात रोज कर्मचारी असतात. गोलाणी मार्केटमध्ये रोज कर्मचारी दिले जात नाहीत. मध्यंतरी बॅरीकेटस् लावण्यात आले होते. दाणाबाजारात ते लावले जातात. अरुंद रस्ते, पार्कींगला जागा नसणे व त्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने हा प्रश्न सातत्याने निर्माण होतो,तरी देखील आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत असतो. वाहनधारकांनी देखील मानसिकता बदलवली पाहिजे, असे कुनगर म्हणाले.