जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट येथे रविवारी रात्री ९.३० वाजता सोपान गोविंदा हटकर (२५, रा हरीविट्ठल नगर) या तरूणाची चॉपरने वार करून चार जणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील चौघाही संशयितांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासात एलसीबीच्या पोलिसांनी अटक असून गोविंदा शांतीलाल झांबरे उर्फ चेरी (२२,रा.नाथवाडा), ज्ञानेश्वर दयारा लोंढे उर्फ नानू (२१, रा. कंजरवाडा), राहुल भरत भट (२०, रा. शालीनीनगर, खोटेनगर) व करण सुभाष सकट (२०, रा. बी.जे.मार्केटजवळ) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
दरम्यान, संशयित हे सोपान याचे मित्र आहेत. सोपानने फायनान्सने दुचाकी घेतली होती. मात्र, फायनान्सचे हप्ते थकल्याने दुचाकी एका खळ्यात लपवून ठेवली होती. पण, गोविंदा आणि ज्ञानेश्वर यांनी लपवून ठेवलेली दुचाकी परस्पर घेवून तिचा वापर करत होते. याचा सोपानला राग आला होता. रविवारी रात्री दोघांनी सोपान याला दुचाकी घेण्यासाठी गोलाणी मार्केटमध्ये बोलविले. गोलाणीत आल्यावर त्याने दोघांना शिवीगाळ केल्यामुळे वाद उफाळून आला. दुस-याच क्षणी दोघांसह इतरांनी सोपान याला बेदम मारहाण करून त्याच्यावर चॉपरने वार करीत खून केला, अशी कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लग्नाला नेली दुचाकी, माहिती पडताच बोलविले जळगावात...
हरिविठठल नगरात सोपान हटकर हा आई सोबत वास्तव्यास होता, सेंट्रींग तसेच मिळेल ते मजुरी काम करुन तो उदरनिर्वाह भागवति होता, तर त्याची आई धुणीभांडीचे काम करुन उदरनिर्वाहात हातभार लावत होती. सोपान याने काही दिवसांपूर्वी फाननान्सवर हप्त्याने दुचाकी घेतली आहे. दुचाकी काही हप्ते थकल्याने शोरुम कंपनीवाले ही दुचाकी ओढून घेवून जातील, या भितीने सोपान याने त्याची दुचाकी त्याचे रिंगणगाव येथील मामांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती.
गुढीपाडव्याच्या दिवशी सोपानचे मित्र गोविंदा झांबरे व ज्ञानेश्वर लोंढे यांनी रिंगणगाव येथे लपविलेली दुचाकी परस्पर घेवून जावून तिचा वापर करत होते. याचा त्याला राग आला होता. नंतर त्याने दोघांना तुम्ही दुचाकी का घेवून आले म्हणत रागविले होते. पण, त्यानंतरही रविवारी दुपारी गोविंदा व ज्ञानेश्वर हे दोघेही सोपान याची दुचाकी घेवून पारोळा येथे लग्नाला गेले होते. याची सोपानला माहित झाल्यावर त्याने फोन करुन माझी दुचाकी घेवून या म्हणत दोघांना जळगावला बोलावले होते.
दुचाकीवरून उफाळला वाद अन् केले चॉपरने वार...
रविवारी रात्री दोघांनी दुचाकी परत घेण्यासाठी सोपान याला गोलाणी मार्केट येथे बोलावले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तो गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी घेण्यासाठी आला. याठिकाणी गोविंदा, ज्ञानेश्वर यांच्यासह राहूल भरत भट व करण सकट हे उभे होते. मात्र, सोपान हा मद्याच्या नशेत शिवीगाळ करू लागल्यामुळे वाद उफाळून आला. नंतर ज्ञानेश्वर याने त्याच्यावर चॉपरने वार करून खून केला. तसेच इतरांनीही चॉपरने वार केले.पोलिस घटनास्थळी, शोधा-शोध सुरू...
गोलाणीत खुन झाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपासचक्र फिरविले. काही लोकांकडून तरूणांमध्ये वाद होवून खुन झाल्याचे कळताच, संशयितांचा पोलिसांच्या तीन पथकांनी शोध सुरू केला तर मयताची ओळख पटविण्यासाठी सुध्दा प्रयत्न सुरू केले. संशयितांचे धागेदोरे मिळताच, त्यांनी कुणाला कंजरवाडा तर कुणाला खोटेनगर येथून अटक केली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासात संशयितांचा शोध पोलिसांना घेतला. या काळातच मयत सोपान याची ओळख पटल्यानंतर त्याच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय रवींद्र बागुल करीत आहेत. चौघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाई
एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चोभे, अमोल देवढे, विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, संदीप पाटील, महेश महाजन, अकरम शेख, संदीप सावळे, संतोष मायकल, विजय पाटील, प्रवीण मांडोळे, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींनी ही कारवाई केली आहे.