विजयकुमार सैतवालजळगाव : आंतराष्ट्रीय पातळीवर वाढलेली मागणी व भारतीय रुपयात सातत्याने होत असलेली घसरण यामुळे सोने-चांदीमध्ये तेजी सुरूच असून शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात तब्बल ८०० रुपयांनी वाढ होऊन सोने ४२ हजार ८०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहे. चांदीतही एकाच दिवसात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने भाववाढ सुरू असून शुक्रवारी तर एकाच दिवसात कधी नव्हे एवढी मोठी ८०० रुपये प्रती तोळ््यांनी वाढ झाली आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे भाव वधारतच असल्याने १८ रोजी डॉलरचे मूल्य ७१.५८ रुपये, २० रोजी ७१.६७ रुपये आणि २१ रोजी तर डॉलरचे मूल्य ७१.९७ रुपये झाले. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती कधी नव्हे एवढ्या प्रमाणात वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.२० रोजी सोन्याचे भाव प्रथमच ४२ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर हे भाव कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र २१ रोजी तर थेट ८०० रुपयांनी हे भाव वाढून सोने ४२ हजार ८०० रुपयांवर पोहचले. २० रोजी ४८ हजारावर असलेल्या चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजाराने वाढ होऊन ती ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. या पूर्वी ७ जानेवारी रोजी चांदी ४९ हजार ५०० रुपये प्रती किलो झाली होती.आता सोने ४३ हजार रुपये प्रती तोळा तर चांदी ५० हजार रुपये प्रती किलोचा टप्पा गाठते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकन डॉलरचे दर वधारत असल्याने सोने-चांदीत तेजी येत आहे. २१ रोजी तर सोन्याचे भाव ८०० रुपये तर चांदीचे भाव एक हजार रुपयांनी वधारले आहे.- किशोर सुराणा, सुवर्ण व्यावसायिक.
सोने ४३ हजार तर चांदी ५० हजाराच्या दिशेने, सोन्यात एकाच दिवसात ८०० तर चांदीत एक हजाराने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:50 PM