विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोने-चांदीचे भाव सोमवार, २२ एप्रिल रोजी कमी झाले. यात सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ७३ हजार ४०० रुपये प्रति तोळा तर चांदीमध्ये एक हजार २०० रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली.मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एप्रिल महिन्यात तर सोने ७४ हजारांच्या पुढे तर चांदी ८५ हजारांवर पोहोचली.
सतत मोठी भाववाढ होत असलेल्या या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत अधूनमधून किरकोळ घसरण झाली, मात्र सततच्या मोठ्या भाववाढीने भाव उच्चांक गाठत गेले. त्यानंतर आता सोमवार, २२ एप्रिल रोजी चांदीच्या भावात तर थेट एक हजार २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ती ८४ हजारांवरून ८२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. दुसरीकडे सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची घसरण झाली व ते ७३ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सट्टा बाजारात दलालांनी सोने-चांदीची विक्री वाढवल्याने हे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.