विजयकुमार सैतवाल
जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असल्याने व इंधनाचेही दर वाढत असल्याने या दोन्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या भावावरही परिणाम होत आहे. २२ दिवसात सोन्याच्या भावात तब्बल १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे सोने पुन्हा ३१ हजारावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीला मागणी नसल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ३९ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपयांवर आली.रुपयाचे अवमूल्यन, जागतिक पातळीवर विविध देशांमधील वाद, नैसर्गिक आपत्ती, इंधनाचे दर या सर्व घटकांचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होत असतो. त्यात आता तर रुपयाचे अवमूल्यन व इंधनाचे वाढते दर अशा दोन्ही घडामोडी एका पाठोपाठ होत असल्याने सोन्याच्या भावात दररोज वाढ होत आहे.डॉलर २.४० रुपयांनी, सोने १२०० रुपयांनी वधारले नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारी २०१८ रोजी सोन्याच्या २९ हजार ९०० रुपयांच्या भावासह सराफ बाजारातील व्यवहारास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या भाववाढीस सुरुवात होऊन सोन्याने ३० हजारांचा पल्ला गाठला. त्यानंतर ही वाढ कायम राहत लग्नसराईमध्ये सोने ३१ हजारांच्या पुढे गेले. मात्र जुलै महिन्यापासून यात घसरण होत जाऊन १७ आॅगस्ट रोजी ते ३० हजारांच्या खाली आले होते. त्या दिवशी डॉलरचे मूल्य ६९.३० रुपयांवर होते त्यावेळी सोने २९ हजार ९०० रुपयांवर होते. मात्र डॉलरचे दर हळूहळू वाढत जाऊन ते ९ सप्टेंबर रोजी ७२.१० रुपयांवर पोहचले त्यावेळी सोन्याचे दर ३१ हजार रुपये झाले. डॉलरचा दर केवळ २.४० रुपयांनी वाढला तरी भारतात सोने १२०० रुपयांनी वाढल्याने रुपयांच्या अवमूल्यनाचा किती मोठा परिणाम होत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सर्वच व्यापारी चिंतित आहे.१७ आॅगस्ट रोजी २९ हजार ९०० रुपयांवर असलेल्या सोन्यात हळूहळू वाढ होत जाऊन ते २२ आॅगस्ट रोजी ३० हजार २०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी ३० हजार ४०० रुपये अशी २०० रुपयांची वाढ झाली. ३० आॅगस्ट रोजी सोने ३० हजार ८०० रुपयांवर पोहचून ७ सप्टेंबर रोजी ३१ हजारांचा पल्ला गाठला. त्यानंतर दोन दिवसांपासून सोने ३१ हजारांवर कायम आहे.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यास सोन्याच्या दरात वाढ होते. यास जुलै व आॅगस्ट महिना अपवाद ठरला. त्यावेळी अमेरिकेतच सोन्याला मागणी कमी झाल्याने रुपयाचे अवमूल्यन झाले तरी सोन्यात घसरण होऊन ते ३० हजार रुपयांच्या खाली गेले होते. मात्र आता अमेरिकेतील सोने बाजारात उलाढाल वाढल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढले. त्यात अमेरिकन डॉलरचे दर ७२.१० रुपये झाल्याने सोन्याच्या भाववाढीस मदत होत आहे.मागणी नसल्याने चांदीच्या भावात घसरण होत आहे. ६ सप्टेंबर रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीच्या भावात एकाच दिवसात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ३९ हजारावर आली.