जळगाव : कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी वाढण्यासह या मौल्यवान धातूंचे भावदेखील नव्या उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे यंदाचे वर्ष सोने-चांदीला नवीन झळाली देणारे ठरले. २०२० या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ६ ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव थेट ५७ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच १ जानेवारी रोजी ४७ हजारांवर असलेली चांदीदेेखील ६ ऑगस्ट रोजी ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढ झाल्याने सोने-चांदीतील आतापर्यंतही ही उच्चांकी ठरली. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत जाऊन धनत्रयोदशीला ते ५१ हजार १०० प्रति तोळ्यावर, तर चांदी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.
सध्यादेखील सोने-चांदीत चढ-उतार सुरूच असून, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोन्याचे भाव ५१ हजारांवर, तर चांदी पुन्हा ७१ हजारांवर पोहोचली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टि कमॉडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून त्या काळात सोने-चांदी वधारत गेले.
लाकॅडाऊनपूर्वीचे सोने-चांदीचे भाव पाहता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने ४४ हजारांच्या, तर चांदी ४८ हजारांच्या पुढे गेली होती.
सोने-चांदीचे भाव झाले एकसारखे
एरव्ही सोने-चांदीचे भाव कधी सारखे नसतात. मात्र यंदाच्या वर्षात तर २७ जून रोजी सोने-चांदी दोघांचेही भाव ४९ हजार ३०० रुपये होऊन दोघही धातूंचे भाव सारखेच राहिले. यात सोने प्रति किलोवर तर चांदी प्रति किलोवर होती.
व्यापारी संकुलासाठी मोठी प्रतीक्षा
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असताना बाजारपेठ जसजशी अनलॉक होत गेली तसतसे इतर व्यवहार सुरू होत गेले. मात्र शहरातील मोठी बाजारपेठ असलेले महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यांसह विविध व्यापारी संकुल मात्र सुरू होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. यात अगोदर समविषम पद्धतीने हे संकुल सुरू झाले, मात्र पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळत नसल्याने व्यापारी बांधव चिंतित होते.
मुहूर्त हातचे गेले
कोरोनामुळे ऐन लग्नसराईत बाजारपेठ बंद राहिली. तसेच गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे मुहूर्त हातचे गेले. त्यामुळे या काळात सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजार, मोबाइल मार्केट यांना चांगलीच झळ बसली. करोडो रुपयांचा माल भरून ठेवलेला असताना तो केवळ दुकानात पडून राहिला. व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान व्यापारी बांधवांनी दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला.
नवरात्रोत्सवापासून चैतन्य
बाजारपेठ तशी नवरात्रोत्सवापासून पूर्वपदावर येऊ लागली. यात विजयादशमी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा सण-उत्सवामुळे बाजारपेठेत नवचैतन्य आले व व्यापारी वर्ग सुखावला.