जळगाव : सट्टा बाजारातील तेजी-मंदीने सोने बाजार अस्थिर होत आहे. दुसरीकडे पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीचे भाव कमी होत आहेत. सध्या सोने ५८ हजार २०० रुपये प्रति तोळा असून चांदी ७२ हजार रुपये प्रति किलोवर आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव कमी होत असून दोन दिवसात सोने ८०० रुपये प्रति तोळ्याने कमी झाले आहे. तसेच पाच दिवसांत चांदीचेही भाव एक हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. तसे पाहता गेल्या महिन्याच्या तुलनेच सध्या डॉलरचे दर वाढून ते ८३.१८ रुपये झाले आहेत. मात्र तरीही भाव कमी होण्याचे कारण सट्टा बाजार सांगितला जात आहे.
सोन्याचे भाव वाढत गेल्याने दलालांनी मोठी खरेदी करून ठेवत साठा केला. त्यात आता त्यांच्याकडून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे हे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. चांदीच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे चांदीचेही भाव एकदम वाढत आहे तर कधी एकदम कमी होत आहे. गेल्या महिन्यातही चांदी ७१ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर पुन्हा भाववाढ होत जाऊन ती २५ सप्टेंबरपर्यंत ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र पुन्हा घसरण होत जाऊन ती आता ७२ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे.
पंधरवाडा राहणार शांतआंतरराष्ट्रीय पातळीवर एकतर सट्टाबाजारामुळे भाव कमी होत आहे तर आपल्याकडे पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षाच्या पंधरवाड्यात तसे सोने-चांदी खरेदी करणे टाळले जाते. त्यामुळेही लगेच भाव कमी होत असल्याची सुवर्णबाजारात स्थिती आहे.
दिवाळीपर्यंत पुन्हा तेजीसध्या सोने-चांदीचे भाव कमी होत असून दिवाळीपर्यंत त्यात आणखी घसरण होईल, अशी चर्चा आहे. मात्र सध्या आयात शुल्क कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही, डॉलरचे दर वाढत आहे व सट्टा बाजारातील विक्री दिवाळीपर्यंत थांबून सोने-चांदीत पुन्हा तेजी येण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविली आहे.
सट्टा बाजारातील स्थितीमुळे सोने-चांदीत चढ-उतार होत आहे. एकतर अमेरिकन डॉलरचे दर वाढले असून सध्या आयात शुल्क कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढू शकतात. - अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन
पितृपक्षात आपल्याकडे सोने-चांदीला मागणी कमी असते व सट्टाबाजाराचाही परिणाम आहे. त्यामुळे आगामी काही दिवस सोने-चांदीचे भाव कमी राहू शकतात. मात्र त्यानंतर पुन्हा त्यात तेजी येईल. - स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन