जळगाव : गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात सोमवार २२ मार्च रोजी प्रत्येकी ५०० रुपयांची घसरण झाली. यामुळे सोने ४५ हजार ७०० रुपये प्रति तोळा तर चांदी ६८ हजार रुपये प्रति किलोवर आली.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात सोमवारी सुवर्ण बाजार उघडताच भाववाढीने सुरुवात झाली. त्यानंतर सलग तीन दिवस ही भाववाढ कायम राहत गुरुवारी सोने ४६ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र शुक्रवारी सोन्याच्या भावात दोनशे २५० रुपयाची घसरण होऊन ते ४५ हजार ९५० रुपये आले. दुसरीकडे चांदीच्या भावातही सोमवारी ३०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर मात्र बुधवार, १७ मार्च रोजी चांदीत ३०० रुपयाची घसरण झाली. मात्र गुरुवारी पुन्हा चांदी २०० रुपयांनी वधारली व शुक्रवारी आणखी त्यात १०० रुपयांची भर पडून चांदी ६८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली. तसे पाहता गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीमध्ये एक सोबत वाढ होत आहे किंवा एक सोबत घसरण होत आहे. मात्र शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण झाली तर चांदीत वाढ झाली.
शनिवारी सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्यानंतर सोमवारी २२ मार्च रोजी सोन्याच्या भावात पाचशे रुपये भरून ते ४५ हजार ७०० रुपये तर चांदीतही पाचशे रुपयाची घसरण होऊन ती ६८ हजार रुपये प्रति किलो वर आली.
सट्टा बाजारातील कमी अधिक खरेदीमुळे असा परिणाम होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.