जळगाव : अनेक दिवसांनंतर शनिवारी ९०० रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या दरात सोमवारी पुन्हा ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चांदीतही ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. अमेरिकन डॉलरचे दर वाढून ते ७५.२८ रुपयांवर पोहोचल्याने सोन्या-चांदीची दरवाढ होत आहे. तसेच दलालांमार्फत सुवर्णबाजारात अस्थिरता निर्माण केली जात असल्याने सतत दर कमी-जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या संकटात सातत्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते अचानक कमी, तर कधी जास्त होत आहेत. दरांमध्ये अस्थिरता गेल्या बुधवारी १४०० रु पयांनी वाढ होऊन सोने ५४ हजार ९०० रु पये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यावेळी ६७ हजार ५०० रु पयांवर असलेल्या चांदीत १,३०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोने व चांदी यांचे दर खाली-वर होतं राहिले. सोमवारी मात्र सोने व चांदी या दोन्हीमध्ये दरवाढ झाली. सोन्याच्या दरात ७०० रुपये, तर चांदीमध्ये ५०० रुपयांनी वाढ होऊन ते अनुक्रमे ५४ हजार ७०० व ६६ हजार ५०० रु पये झाले.