लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफा बाजारात २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव १०० रुपयांनी कमी होऊन ६१,३०० रुपयांवर आल्याने ग्राहकांनी फायदा घेतला. चांदी मात्र, ७३,५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली.
ग्राहकांनी मंगलपोत, डिझायनर सोन्याचे हार, कर्णफुले यासह अस्सल सोन्यापासून तयार केलेल्या आपट्याच्या पानांना पसंती दिल्याचे सांगण्यात आले. घटस्थापनेपासून सोन्याच्या भावात वाढ होत गेली. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला भाव कमी होऊन ते ६१,४०० रुपये प्रतितोळ्यावर आले. त्यानंतर विजयादशमीला भावात आणखी घट झाली.