जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरूच असून शनिवारी सोन्याच्या भावात २५० रुपयांनी घसरण झाली व सोने ५० हजारांच्या खाली आले. या घसरणीमुळे सोन्याचे भाव ४९ हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर आले, तर चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनमुळे घसरण झाल्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरण होत असल्याने सुवर्ण बाजारावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यात कोरोनामुळे सोने-चांदीत गुंतवणूक वाढल्यानंतर आता याच कोरोनावर लस आल्याने सोने-चांदीतील घसरण वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात रशियाची लस आल्यानंतर त्यावेळीही मोठी घसरण झाली होती. भारतात प्रत्यक्षात लसीकरणाची तयारी सुरू झाली व गेल्या आठवड्यात या लसीच्या ड्राय रनदरम्यान सोने एक हजाराने, तर चांदी पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झाली होती.
दीड महिन्यानंतर सोने पुन्हा ५० हजारांच्या खाली
देशभरात शनिवार, १६ जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर त्याचाही परिणाम सुवर्ण बाजारावर जाणवू लागला आहे. शनिवारी चांदीच्या भावात थेट एक हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ६६ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. तर, सोन्याच्याही भावात २५० रुपयांनी घसरण झाली. ही किरकोळ घसरण असली, तरी या घसरणीमुळे सोने ५० हजार रुपयांच्या खाली आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांंच्या पुढे गेलेल्या सोन्याच्या भावात दीड महिन्यांपूर्वी घसरण झाली व ३० नोव्हेंबर रोजीदेखील सोने ४८ हजार ७०० रुपयांवर येऊन ५० हजारांंच्या खाली आले होते. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी सोने ५०० रुपयांनी वधारून पुन्हा ५० हजारांंच्या पुढे गेले होते. तेव्हापासून ५० ते ५२ हजारांंच्या मध्ये राहिले. मात्र शनिवार, १६ जानेवारी रोजी पुन्हा सोने ५० हजारांंच्या खाली आले.