जळगाव : आठ दिवसांपासून कमी-कमी होत असलेल्या सोन्याच्या भावात शनिवारी काहीसी वाढ होऊन सोने पुन्हा ५० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. चांदी मात्र गेल्या सहा दिवसांपासून ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
दिवाळीनंतर सोने चांदीचे भाव कमी-कमी होत जाऊन ५० हजार रुपये रुपयांच्या खाली आले होते. त्यानंतर मात्र आठ दिवसांपूर्वी काहीही वाढ होऊन सोने पुन्हा ५० हजार रुपयांच्या पुढे गेले होते. तीन दिवसांत सोन्याचे भाव कमी होत गेले. मात्र शनिवारी पुन्हा २०० रुपये प्रति तोळ्याने वाढून ते ५० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले होते. त्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी ६० हजार रुपयांवर असलेले चांदी १ डिसेंबरला ६१ हजार रुपयांवर पोहोचली होती. हळूहळू वाढ होत जाऊन ४ डिसेंबर रोजी चांदी पुन्हा ६५ हजार रुपयांवर पोहोचली. त्यानंतर मात्र चांदीचे भाव कमी होऊन ५ रोजी ६४ हजार ८०० रुपयांवर आले. सहा दिवसांपूर्वी तर हे भाव आणखी कमी होऊन ६४ हजार ५०० रुपयांवर आले. तेव्हापासून चांदी याच भावावर स्थिर आहे.