लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीत सुरू असलेली घसरण थांबत नसून शुक्रवारी सोन्याच्या भावात पुन्हा ७०० रुपयांनी घसरण होऊन ते ४७ हजार ८०० रुपयांवर आले आहे. चांदीतही ५०० रुपयांनी घसरण होऊन ६८ हजार ५०० रुपयांवर आली. पाच दिवसात सोन्यात २ हजार १०० तर चांदीत सहा हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात उसळी सुरू आहे. सोने-चांदीत मात्र घसरण होत आहे. यात कधी नव्हे एवढी सलग पाच दिवस सातत्याने घसरण होत आहे. सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी करणे तसेच पायाभूत सुविधांसाठी केलेल्या तरतुदी यामुळे उद्योगांना चालना मिळणार असल्याच्या शक्यतेने शेअर बाजाराकडे कल वाढून सराफ बाजारावर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अंदाज ठरतोय खरा
अर्थसंकल्पात सोने-चांदीविषयी काही घोषणा झाल्यास त्यांचे भाव कमी होऊन सोने ४७ हजारापर्यंत खाली येऊ शकते, असे सांगितले जात होते. त्यानुसार हा अंदाज खरा ठरत असून शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ७०० रुपयांच्या घसरणीनंतर सोने ४७ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली आले आहे. अशाच प्रकारे चांदीतही ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ६८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
पाच दिवसापासून सोने-चांदीतील घसरण
दिनांक सोने चांदी
१ फेब्रुवारी सकाळी - ५०,००० ७४,०००
१ फेब्रुवारी दुपारी ५०,४०० ७५,५००
१ फेब्रुवारी -
(आयात शुल्क कपातीची घोषणा)४९,९०० ७४,५००
२ फेब्रुवारी ४९,५०० ७३,०००
३ फेब्रुवारी ४८,९०० ७०,०००
४ फेब्रुवारी ४८,५०० ६९,०००
५ फेब्रुवारी ४७,८०० ६८,५००