जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सतत भाववाढ होत असलेल्या सोन्याच्या दरात शनिवारी ९०० रुपयांनी घसरण होऊन सोने ५४,००० रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीत मात्र एक हजार रुपयांनी वाढ होऊन ६६,००० रुपये प्रति किलोवर पोहचली. मागणी वाढण्यासह जागतिक पातळीवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने बुधवारी सोन्याच्या भावात १४०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५४ हजार ९०० रुपये प्रति तोळावर पोहचले होते.मात्र ६७,५०० रुपयांवर असलेल्या चांदीत १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७ जुलैला सोने ४९,२०० वर होते. त्यानंतर १४ जुलैला ८०० रुपयांनी वाढून ५० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. २१ जुलैला पुन्हा एक हजाराने वाढ झाली. २८ जुलैला अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ५३ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते.चांदीमध्येदेखील गेल्या अनेक दिवसांपासून वाढ सुरू आहे. ७ जुलैला चांदी ५०,५०० वर होती. त्यानंतर १४ जुलैला ३ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ५४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यात २१ जुलैला आणखी सहा हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ६० हजारांच्याही पुढे गेली होती.जागतिक पातळीवर बँकांनी व्याजदर कमी केल्याने सोन्यात गुंतवणूक वाढून मोठी मागणी वाढली आहे. यामुळे भाववाढ होत आहे. मात्र अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोन्याचे भाव घसरले.- स्वरूप लुंकड, सचिव,जळगाव शहर सराफ असोसिएशन