विजयकुमार सैतवाल, जळगाव : सोन्याचे भाव नवनवीन उच्चांक गाठत असून शुक्रवार, २९ मार्च रोजी एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोने ६८ हजार ६०० रुपये प्रति तोळा अशा रेकॉर्डब्रेक भावावर पोहचले आहे. एक तोळा सोन्यासाठी तीन टक्के जीएसटीसह आता ७० हजार ६५८ रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, चांदीच्याही भावात शुक्रवारी ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
अमेरिकन बँकांची स्थिती बिकट झाल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव वाढू लागले. त्यामुळे सोने नवनवीन उच्चांकी गाठत आहे. गेल्या आठवड्यात २१ मार्च रोजी सोन्याने ६७ हजारांचा पल्ला ओलांडला व ते ६७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर त्यात काहीसी घसरण झाली.
मात्र २८ मार्च रोजी सोने पुन्हा ६७ हजार ६०० रुपये प्रति तोळा झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवार, २९ मार्च रोजी त्यात एक हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोने ६८ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
अमेरिकन बँकांची बिकट झालेली स्थिती सुधारत नसताना त्यांनी व्याजदर आणखी कमी केल्याने विदेशात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे हे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात व झपाट्याने वाढत आहेत. शिवाय इतरही विकसित देशांनी सोन्याची खरेदी वाढवल्याने सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दिवाळीपर्यंत ७५ हजार भाव?
सोन्याचे वाढते भाव पाहता, ते दिवाळीपर्यंत ७० हजारांपर्यंत पोहचतील, असा अंदाज होता. मात्र सध्याची स्थिती पाहता सोन्यात झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे ते येत्या काही दिवसातच ७० हजारांपर्यंत जावू शकते. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने ७० नव्हे तर ७५ हजारांपर्यंत पोहचेल, असा अंदाज या वाढीवरून व्यक्त केला जात आहे.
मार्च महिन्यातील सोने-चांदीचे वाढत गेलेले भाव-
दिनांक सोने चांदी
१ मार्च ६३,१०० ७१,५००५ मार्च ६४,६५० ७२,८००८ मार्च ६५,७०० ७४,०००९ मार्च ६६,००० ७४,०००२१ मार्च ६७,३०० ७६,०००२८ मार्च ६७,६०० ७५,०००२९ मार्च ६८,६०० ७५,५००
अमेरिकन बँकांची स्थिती बिकट होण्यासह आता तेथील बँकांनी व्याजदर आणखी कमी केल्याने विदेशात सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव झपाट्याने वाढत आहे. ही वाढ अशीच कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोने ७५ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत जावू शकते.- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक, जळगाव.