लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे वाढत असलेले भाव गुरुवारी घसरल्यानंतर शुक्रवारीदेखील सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण झाली. यामुळे सोन्याचे भाव ४८ हजार ४२० रुपयांवर आले. मात्र चांदी ७१ हजार ४०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्री प्रमाणात खरेदीपेक्षा विक्री अधिक असल्याचे दोन दिवसांपासून दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यापासूनच सोने-चांदीचे भाव वाढत आले. मात्र गुरुवार, २७ मे रोजी सोने-चांदीत घसरण झाली. यामध्ये सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ६२० रुपये प्रतितोळ्यावर आले होते, तर चांदीदेखील १३०० रुपयांनी घसरून ७१ हजार ४०० रुपये प्रति किलोवर आली होती. या घसरणीनंतर शुक्रवार, २८ मे रोजी पुन्हा सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ४२० रुपये प्रति तोळ्यावर आले. सोन्यात घसरण झाली असली तरी चांदी ७१ हजार ४०० रुपये प्रतिकिलो दर स्थिर आहे.
विक्रीचे प्रमाण एक टक्क्यांनी घटले
गुरुवार, २७ मे रोजी खरेदीचे प्रमाण ३९ टक्के होते ते शुक्रवारीदेखील तेवढेच राहिले. मात्र विक्रीचे प्रमाण कमी होऊन ते ५७ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांवर आले. ४ टक्के थांबलेले व्यवहार (होल्ड) शुक्रवारी पाच टक्के झाले.