जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची वाढलेली मागणी व अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात होत असलेली घसरण यामुळे दोन दिवसांपासून वाढत असलेल्या सोन्याच्या भावात तिसऱ्या दिवशी चढ-उतार होताना दिसून आला. गुरुवार, ८ रोजी सकाळी ३७ हजार २०० रुपये प्रती तोळा असलेले सोने दुपारी ३७ हजार ३५० रुपयांवर पोहचले. चांदी मात्र ४२ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ६ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात बुधवारी ९०० रुपयांनी वाढ झाली व सोने ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर मात्र ८ रोजी रुपयात थोडी सुधारणा होऊन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी वधारला. त्यामुळे सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ८ रोजी सकाळी सोने ३७ हजार २०० रुपयांवर आले.एकाच दिवशी दोन भाव८ रोजी सकाळी सुवर्ण बाजार उघडला त्या वेळी सोने ३७ हजार २०० रुपये प्रती तोळा होते. त्यानंतर दुपारी त्यात १५० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३७ हजार ३५० रुपयांवर पोहचले. परिणामी वाढती मागणी व रुपयातील चढ-उचार या मुळे सोन्यातही चढ-उतार होऊन एकाच दिवसात दोन भाव दिसून आले.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी व भारतीय रुपयातील चढ-उतारामुळे सोन्याच्या भावातही चढ-उतार होत आहे. रुपयाच्या स्थितीमुळे सोन्याच्या भावात मात्र अशीच वाढ होणाच्या शक्यता आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
सोन्याच्या भावात चढ-उतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:29 PM