जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ५१ ते ५२ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात पितृपक्ष सुरू झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत असून सोमवार, १९ सप्टेंबर रोजी ते ५० हजार ४५० रुपये प्रति तोळ्यावर आले. या पूर्वी २१ जुलै रोजी सोन्याचे भाव ५० हजार ७०० रुपयांवर होते. दोन महिन्यांनंतर पुन्हा हे भाव नीचाकीवर आले आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात वाढ झाली आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले. मात्र गेल्या आठवड्यापासून त्यात घसरण सुरू झाली. तसे पितृपक्षात अनेक जण खरेदी टाळत असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होत आहे. १३ सप्टेंबर रोजी ५१ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १४ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. त्यानंतर १५ रोजी पुन्हा १५० रुपयांची तर १६ रोजी ४५० रुपयांची घसरण झाली व सोने ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. त्यानंतर १७ रोजी त्यात ४०० रुपयांची वाढ झाली मात्र सोमवार, १९ रोजी पुन्हा १५० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ४५० रुपयांवर आले. दुसरीकडे चांदीचे भाव वाढत आहे. १२ सप्टेंबर रोजी ५६ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांची वाढ झाली व ती ५७ हजार ८०० रुपयांवर पोहचली. त्यानंतर १४ रोजी ८०० रुपयांची घसरण झाली मात्र १५ रोजी पुन्हा ६०० रुपयांची वाढ झाली. १७ रोजी चांदी ५७ हजार ९०० रुपयांवर चांदी पोहचली. १९ रोजी ती ५७ हजार ५०० रुपयांवर आली.