विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : सोन्याचे भाव कमी न होता वाढतच असून मंगळवार, १६ एप्रिल रोजी तर त्यात ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७३ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात २०० रुपयांची घसरण होऊन ती ८३ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली.
गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या भावात दररोज वाढ होत आहे. सोमवारी ३०० रुपयांच्या वाढीने ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी पुन्हा ९०० रुपयांची वाढ झाली. या वाढीने सोन्याच्या भावाने पुन्हा नवीन उच्चांक गाठत ते ७३ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह आता ७५ हजार ९११ रुपये मोजावे लागणार आहे.