विजयकुमार सैतवालजळगाव : भारतीय रुपयात सातत्याने होत असलेल्या घसरणीसह मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातीलही शेअर बाजार सतत गडगडत असल्यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे १० दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार १०० रुपयांनी तर चांदीमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचे भाव आणखी एका नवीन उच्चांकीवर पोहचले आहे. शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी सोने प्रथमच ४३ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले तर चांदी शुक्रवारच्या ४९ हजार रुपये प्रती किलोच्या भावावर स्थिर आहे.सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढतोय कलअमेरिका, इराण यांच्यातील तणावामुळे जानेवारीपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वधारु लागले. मध्यंतरी तणावाचे वातावरण काहीसे कमी झाल्याने सोने-चांदीत नरमाई आली. मात्र आता पुन्हा तणाव वाढीचे चिन्ह असल्याने व त्यात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच आहे. यात भरात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असल्याने अमेरिका, जपान, इंग्लंड या प्रमुख देशांसह भारतातही सोन्यामध्ये गुंतवणुकीकडे कल वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे एकूणच जागतिक पातळीवरील तणाव, भारतीय रुपयातील तसेच शेअर बाजारातील घसरण अशा तीन कारणांनी सोने-चांदीच्या भावाला चांगलीच ‘झळाळी’ येत आहे.दीड महिन्यात तीन उच्चांक पातळीसोन्याच्या भावाचा विचार केला तर या मौल्यवान धातूने दीड महिन्यात तीन नवीन उच्चांकी गाठली आहे. ७ जानेवारी २०२० रोजी सोने ४१ हजार ४०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी ४२ हजार रुपये व आता २२ फेब्रुवारी रोजी ४३ हजार रुपये प्रती तोळा, असे उच्चांकीचे भाव सोने गाठत आहे.१० दिवसात २१०० रुपयांनी वाढवरील सर्व कारणांमुळे गेल्या १० दिवसात सोन्याचे भाव तब्बत दोन हजार १०० रुपये प्रती तोळ््याने वाढले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ रोजी ४१ हजारावर पोहचले. हळूहळू वाढ होत जाऊन १९ रोजी ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० रोजी ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ रोजी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहचले व २२ रोजी तर ४३ हजाराचा टप्पा सोन्याने गाठला.चांदीलाही ‘चकाकी’गेल्या १० दिवसांपासून चांदीचेही भाव सतत वाढतच आहे. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार रुपयांवर पोहचले. १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रती किलोवर चांदी पोहचली. २२ रोजीदेखील ती ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.रुपयातील घसरणीसह शेअर बाजारतही घसरण होत असल्याने सोने-चांदीच्या गुंतवणुकीकडे कल वाढत आहे. त्यामुळे या धातूंचे भाव सातत्याने वाढत आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
सोने पोहचले ४३ हजारावर, सोन्यात १० दिवसात २१०० तर चांदीत तीन हजाराने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:43 PM