जळगाव : सोने-चांदीच्या भावात तेजी सुरूच असून शनिवारी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३८ हजार ६०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहे. चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन ती ४५ हजारावर पोहचली आहे. सोन्याने तर पुन्हा नवी उच्चांकी गाठली असून सुवर्णनगरी जळगावात ते प्रथमच ३८ हजाराच्या पुढे गेले आहे.अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत. जून महिन्यापासून सुरू झालेली ही वाढ कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचीही चिंता वाढविली आहे.रुपयात सुधारणा तरी सोने-चांदी वधारलेअमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत आहे. मात्र शनिवारी रुपयात काही अंशी सुधारणा झाली तरी सोने थेट ६०० रुपये प्रती तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रती किलोने वाढले. यात २३ रोजी ७१.८२ रुपये असलेले डॉलरचे भाव २४ रोजी २९ पैशांनी कमी होऊन ते ७१.५१ रुपयांवर आले तरी सोने-चांदीचे भाव कमी न होता मोठ्या प्रमाणात वाढले. याला कारण म्हणजे एक तर विदेशात वाढलेली या धातूंची खरेदी व विदेशी वायदे बाजारातून निघणारे वाढीव भाव. त्यामुळे भारतातही हे भाव वाढत आहे.सप्ताहच्या शेवटच्या दिवशी शनिवारी झालेली ही मोठी वाढ आता सोमवारी सुवर्ण बाजार उघडताना कितीवर जाते, याचीही चर्चा सुवर्णनगरीत होऊ लागली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या भावामुळे साठाही करता येत नसल्याने सराफ व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.दरम्यान, सोन्याची ही नवी उच्चांकी असून या पूर्वी सुवर्णनगरी जळगावात जास्तीत जास्त ३५ हजारावर पोहचलेले होते. आता तर ते ३८ हजार ६०० रुपयांवर पोहचले आहे.अमेरिका व चीनने सोने-चांदीची खरेदी सुरूच ठेवली असून त्यामुळे भाव कमी होत नाही. त्यातच वायदे बाजारात दररोज वाढीव भाव निघत असल्याने भाववाढीस मदत होत आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.