विजयकुमार सैतवाल
जळगाव : लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे भाव गुरुवारी प्रथमच ४२ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले तर चांदीही ४८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. अमेरिका व इराण यांच्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्याभावावर मोठा परिणाम होऊन नवीन वर्षापासून त्यांचे भाव वाढतच आहेत.
गेल्या आठवड्यात ४० हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याचे भाव वाढतच गेले. रुपयाच्या तुलनेत डॉलरचे भाव वधारतच असल्याने गुरुवारी ७१.६७ रुपयांवर डॉलर पोहोचल्याने सोन्याच्या भावानेही नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यापासूनचे भाव पाहिले तर ११ फेब्रुवारी रोजी ४० हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात ४०० रुपयांनी वाढ झाली आणि १२ रोजी ते ४० हजार ९०० रुपयांवर पोहोचले होते. ही भाववाढ पुढेही सुरूच राहिली आणि बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी सोने ४१ हजार ७५० रुपयांवर पोहोचले. त्यात आज, गुरुवारी पुन्हा २५० रुपयांनी वाढ झाली आणि सोने ४२ हजार रुपयांच्या नव्या उच्चांकावर जाऊ न पोहोचले.चांदी ५०० रुपयांनी महागसोन्यासोबच चांदीच्याही भावात २० रोजी एकाच दिवसात ५०० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ती ४८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. यापूर्वी ७ जानेवारी रोजी चांदीचे भाव ४९ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर मात्र हे भाव कमी होत गेले. आता चांदीत पुन्हा तेजी येऊ लागली आहे.लग्नसराईमुळे मागणी वाढत असून त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. प्रथमच सोन्याचे भाव ४२ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहचले आहेत.- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, सुवर्ण पेढी, जळगाव